भारतात प्रथमच होणार 'आयर्न मॅन' स्पर्धा; पुण्याच्या 100 स्पर्धकांचा कस लागणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

पुणे : पोहणे, धावणे आणि सायकल चालविणे अशा तीनही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी 'आयर्न मॅन' ही जगभरात लौकिक मिळविलेली स्पर्धा यंदा प्रथमच भारतात गोव्यामध्ये येत्या 20 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. यात पुण्यातून सुमारे शंभर जण सहभागी होणार असून, यात तरुणांबरोबर वयस्कर नागरिकांचाही समावेश आहे. 

पुणे : पोहणे, धावणे आणि सायकल चालविणे अशा तीनही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी 'आयर्न मॅन' ही जगभरात लौकिक मिळविलेली स्पर्धा यंदा प्रथमच भारतात गोव्यामध्ये येत्या 20 ऑक्‍टोबरला होणार आहे. यात पुण्यातून सुमारे शंभर जण सहभागी होणार असून, यात तरुणांबरोबर वयस्कर नागरिकांचाही समावेश आहे. 

जगभरात ही स्पर्धा होत असते. युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिक, कोरिया, तैवान, मलेशिया या देशांनंतर गोव्यात ही स्पर्धा होत आहे. भारतात प्रथम होत असल्याने गोव्यात 'हाफ आयर्न मॅन' होणार आहे. तीन वर्षांनंतर पूर्ण आयर्न मॅन स्पर्धा भरविता येते. आयर्न मॅन स्पर्धेत 24 वेळा भाग घेतलेले कौस्तुभ राडकर यांनी प्रशिक्षित केलेले 55 जण, अतुल गोडबोले यांचे 25 आणि चैतन्य वेल्हाळ यांनी प्रशिक्षित केलेले 10 जण; तर स्वयंप्रशिक्षित 20 स्पर्धक सहभागी होणार आहेत. हे सर्वजण 19 ते 56 वयोगटातील आहेत. 

गोडबोले म्हणाले, "या स्पर्धेत सहभागी व्यक्तीचे सामर्थ्य आणि क्षमता यांची कसोटी लागते. स्पर्धकांनी विद्यापीठ, पाषाण, चांदणी चौक परिसरात धावणे आणि सायकल चालविण्याचा सराव केला. या सर्वांची रंगीत तालीमही घेण्यात आली. दोन किलोमीटर पोहणे, किमान अठरा किलोमीटर धावणे आणि शंभर किलोमीटर सायकल चालविण्याचे सातत्य त्यांनी ठेवले आहे. आता हे सर्वजण गोव्यात साडेआठ तास चालणाऱ्या 'हाफ आयर्न मॅन' स्पर्धेत उतरणार आहेत. यातील बहुतांश प्रथमच या स्पर्धेत भाग घेत आहेत.'' 

पंक्‍चर काढण्याचाही सराव 
पुण्यातील उद्योजक संजीव शहा (वय 56) आणि त्यांचा मुलगा साहिल (वय 27) हे दोघेही सहभागी होत आहेत. याबाबत संजीव शहा म्हणाले, "सध्या मी केवळ सायकलिंग करतो. सामर्थ्याचा कस लावणारी ही स्पर्धा असते. यातूनही तीनही क्रीडाप्रकारांमध्ये पारंगत होता येते. स्पर्धेचे नियम खूप कठोर असतात. सायकल पंक्‍चर झाली वा बिघडली तरी कुणाचीही मदत घेता येत नाही. त्यामुळे दररोज पोहणे, धावणे आणि सायकल चालविण्याबरोबर पंक्‍चर काढण्याचाही सराव केला आहे.'' 

अशी असते स्पर्धा 
- पोहणे : 3.8 किलोमीटर 
- सायकल चालविणे : 180 किलोमीटर 
- धावणे : 42.2 किलोमीटर 
- या प्रत्येक प्रकारातील निम्मे अंतर हे "हाफ आयर्न मॅन'साठी राहणार आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या