नागपूरची दिव्या आता 'ग्रँडमास्टर'च्या उंबरठ्यावर
बुद्धिबळातील प्रतिष्ठेच्या ग्रॅण्डमास्टर किताबाच्या दिशेने वाटचाल करणारी नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुख हिने भारतीय बुद्धिबळ संघटनेतर्फे घोषित क्रमवारीत प्रथमच तिसरे स्थान पटकावून इतिहास घडविला.
नागपूर : बुद्धिबळातील प्रतिष्ठेच्या ग्रॅण्डमास्टर किताबाच्या दिशेने वाटचाल करणारी नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुख हिने भारतीय बुद्धिबळ संघटनेतर्फे घोषित क्रमवारीत प्रथमच तिसरे स्थान पटकावून इतिहास घडविला. नागपूरकर बुद्धिबळपटूने असा बहुमान मिळविण्याची ही पहिलीच वेळ होय.
चेसबेसइंडियातर्फे आज, मंगळवारी ताजी क्रमवारी जाहीर होताच 13 वर्षीय दिव्यासाठी आनंदाची व ऐतिहासिक बातमी आली. दिव्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच 2432 अशी सर्वोच्च येलो रेटिंग प्राप्त केली. शिवाय देशाअंतर्गत अव्वल बुद्धिबळपटूंमध्ये "टॉप थ्री'मध्येही स्थान पटकाविले.
दिव्याने सौम्या स्वामिनाथन (2402 येलो रेटिंग), तानिया सचदेव (2397 येलो रेटिंग), इशा करवडे (2370 येलो रेटिंग), पद्मिनी राऊत (2364 येलो रेटिंग), आर. वैशाली (2353 येलो रेटिंग), भक्ती कुळकर्णी (2350 येलो रेटिंग) आणि विजयालक्ष्मी सुब्बारमणसह (2342 येलो रेटिंग) अन्य दिग्गज खेळाडूंना मागे टाकत ही रॅंकिंग मिळविली.
अव्वल स्थानावर असलेल्या कोनेरी हम्पी व द्रोणावली हरिकानंतर दिव्या आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. दिव्याने अलीकडच्या काळात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
आजपासून सुरू झालेल्या दुबई ओपनमध्ये दिव्याला तिसरा व शेवटचा "नॉर्म' मिळवून महिला ग्रॅण्डमास्टर किताब पूर्ण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तिने पहिला "नॉर्म' गेल्या फेब्रुवारीमध्ये चेन्नई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स स्पर्धेत, तर दुसरा मॉस्को (रशिया) येथील एरोफ्लॉट ओपन ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पूर्ण केला होता.
"ग्रॅण्डमास्टर' किताब मिळविण्यासाठी बुद्धिबळपटूला तीन "नॉर्म' पूर्ण करणे आवश्यक असते. भवन्स विद्यामंदिरची विद्यार्थिनी असलेल्या दिव्याने तिसरा "नॉर्म' पूर्ण केल्यास ती विदर्भातील पहिली महिला ग्रॅण्डमास्टर ठरणार आहे. दुबई ओपनमध्ये रौनक साधवानीलाही दुसरा "नॉर्म' मिळविण्याची संधी आहे. त्याने मॉस्को येथील स्पर्धेत पहिला "नॉर्म' मिळविला होता.