2 ते 6 डिसेंबरमध्ये होणार आठवी कॅरम आय.सी.एफ चषक स्पर्धा

वृत्तसंस्था
Wednesday, 23 October 2019

अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित व आंतर - राष्ट्रीय कॅरम महासंघाच्या मान्यतेने ८ वी कॅरम आंतर - राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा दिनांक २ ते ६ डिसेंबर २०१९ दरम्यान पी. वाय. सी. हिंदू जिमखाना, भांडारकर रोड, पुणे  येथे आयोजित करण्यात आली आहे.

अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित व आंतर - राष्ट्रीय कॅरम महासंघाच्या मान्यतेने ८ वी कॅरम आंतर - राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा दिनांक २ ते ६ डिसेंबर २०१९ दरम्यान पी. वाय. सी. हिंदू जिमखाना, भांडारकर रोड, पुणे  येथे आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असून पी.  वाय. सी. हिंदू जिमखाना या स्पर्धेचे वेनू पार्टनर आहेत. सिनको कंपनी या स्पर्धेचे इक्वीपमेंट पार्टनर असून त्यांचे प्लॅटीनम कॅरम व जिनिअस कॅरमच्या सोंगट्या या स्पर्धेत वापरण्यात येणार आहेत. दुसऱ्यांदा भारताला आय. सी. एफ. चषक स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला असून कॅरमच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा महाराष्ट्रात पुण्यासारख्या ऐतिहासिक ठिकाणी होत आहे.

जवळपास १८ देशांचा सहभाग या स्पर्धेसाठी अपेक्षित असून आत्तापर्यंत कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, पोलंड, स्वित्झर्लंड, फ्रांस, झेक रिपब्लिक, इटली, यु. ए. ई., सर्बिया, बांगलादेश, मालदीव, मलेशिया, श्रीलंका व भारत या १६  देशांनी आपल्या प्रवेशिका निश्चित केल्या आहेत. २०१६ साली इंग्लंड येथे झालेल्या स्पर्धेत विश्व् विजेतेपद पटकाविणारे प्रशांत मोरे व एस. अपूर्वा यांचा समावेश असलेला भारतीय संघ या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असून २०१२ साली श्रीलंका येथे विश्व् विजेतेपद पटकाविणाऱ्या निशांता फेर्नांडोचे कडवे आव्हान भारताला असेल.

नुकत्याच मालदीव येथे झालेल्या १८ वर्षाखालील मुलांच्या अध्यक्षीय कॅरम लीगमध्ये विजेतेपद मिळविलेल्या सुरज मधुवंथाची श्रीलंकेच्या संघात निवड होण्याची दाट शक्यता असून तसे झाल्यास श्रीलंकेचा संघही या स्पर्धेचा दावेदार असू शकतो. तसेच मालदीव येथे झालेल्या पुरुष गटातील विजेता भारतीय संघातील नवीन चेहरा राजेश गोहीलच्या कामगिरीवरही भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून राहील. याशिवाय यापूर्वी २ वेळा विश्व् विजेतेपद पटकाविलेली भारतीय महिला कॅरमपटू रष्मी कुमारीच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल. पुरुष गटात फ्रान्सच्या पियर डुबोईस, स्विझर्लंडच्या बोलीन कार्लिगो, जर्मनीच्या पीटर बोकर, कॅनडाच्या लुईस फेर्नांडीस, बांगलादेशाच्या हाफिझूर रेहमान, मालदीवच्या हसन नाझीम, तर महिला गटात श्रीलंकेच्या रोशिता जोसेफ व चलानी लियानगे, पोलंडच्या पौलिना नोवाकोउस्का  तर मालदीवच्या अमीनथ शुभा आदम  व  फाथमत रायाना  यांचे आव्हान असेल. 

 एकेरी, दुहेरी, स्विस लीग व सांघिक अशा चार गटांत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष श्री भारत देसडला यांनी या स्पर्धेसाठी विशेष पुढाकार घेतला असून असोसिएशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र शाह यांच्या मागर्दर्शनखाली मानद सचिव श्री यतिन ठाकूर, असोसिएशनचे उपाध्यक्ष व स्पर्धा सचिव श्री अरुण केदार यांच्याबरोबर राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे सर्व पदाधिकारी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी काम करत आहेत.

जवळपास १०० आंतर राष्ट्रीय खेळाडू तसेच ५० पेक्षा अधिक राष्ट्रीय  व आंतर - राष्ट्रीय पंच, पदाधिकारी, संघ व्यवस्थापक पुण्यात येणार आहेत. पी. वाय. सी. हिंदू जिमखान्याच्या वातानुकूलित बँक्वेट हॉलमध्ये एकंदर २४ बोर्डवर हे सामने रंगतील. तर यांच्या निवासाची व्यवस्था पी. वाय. सी. हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना व हॉटेल ओकवुड येथे करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रत्येक पंच व प्रमुख पंचांना विशेष गणवेश देण्यात येणार आहे. आंतर - राष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर व कार्यकारी अध्यक्ष रकीबुल हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे.

आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाने भारताचे आंतरराष्ट्रीय पंच श्री अजित सावंत यांची स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून तर भारताचे आंतर राष्ट्रीय पंच श्री केतन चिखले व काशीराम यांची सहाय्यक प्रमुख पंच म्हणून निवड केली आहे. अखिल भारतीय महासंघाच्या महासचिव श्रीमती भारती नारायण या स्पर्धेच्या आयोजन सचिव म्हणून तर आंतर राष्ट्रीय कॅरम महासंघाचे सचिव श्री व्ही. डी. नारायण हे स्पर्धा संचालक म्हणून काम करतील. या स्पर्धेचे बोधचिन्ह ( लोगो ) तयार करण्यात आला असून खेळाडू, पंच, सामनाधिकारी यांच्या गणवेशांवर हे बोधचिन्ह ( लोगो ) छापण्यात येईल. 

या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून प्रेक्षकांसाठी विशेष सोय व एल. ई. डी. स्क्रीन लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या स्पर्धेची प्रसिद्धी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या  wwwmaharashtracarromassociation.com या संकेत स्थळावरून तसेच असोसिएशनच्या फेस बुक, इंस्टाग्राम व ट्विटरवरून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनेलवरून एकाच वेळी या स्पर्धेच्या २  महत्वाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून यापैकी एका सामन्यांचे प्रथमच इंग्रजीमधून समालोचनही करण्यात येईल. स्पर्धेपूर्वी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन स्वतःचे ऍप लॉंच करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने समाजातील शेवटच्या क्रीडा रसिकांपर्यंत या स्पर्धेची माहिती, सामन्यांचे प्रक्षेपण व एकंदरीत कॅरमची माहिती पोहोचविणे शक्य होणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या