सर्वसामान्य कुटुंबातील ऐश्‍वर्या बनली तायक्वाँदो रेफ्री

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 July 2019

कोल्हापूरच्या सर्वसामान्य कुटुंबातील ऐश्‍वर्या राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. वर्ल्ड तायक्वाँदो फेडरेशनच्या तायक्‍वाँदो रेफ्री म्हणून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.

कोल्हापूर - शालेय वयात बौद्धिक अभ्यासक्रमात ती हुशार होती. खेळातही तितकीच चपळ. एखादे क्रीडा कौशल्य असावे म्हणून ती तायक्वाँदो शिकली आणि चिकाटीने खेळत राहिली. खेळातील तिची जिद्द, चपळता या जोडीला तिने उच्च शिक्षण घेत ज्ञानाशी मैत्री घट्ट ठेवली. परिणाम असा झाला की वर्ल्ड तायक्वाँदो फेडरेशनच्या तायक्‍वाँदो रेफ्री म्हणून तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. कोल्हापूरच्या सर्वसामान्य कुटुंबातील ऐश्‍वर्या राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

ऐश्‍वर्या राऊत बिनखांबी गणेश मंदिर परिसरात राहते. आई गृहिणी, तर वडील रिक्षा व्यावसायिक. घराजवळच्याच मलग हायस्कूलची ती विद्यार्थिंनी. २००५ मध्ये शाळेत कोच कृष्णात जंगम यांनी तायक्वाँदोचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या वर्गात ती उत्साहाने सहभागी झाली. आणि त्यात प्रावीण्य मिळवत विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करू लागली. विविध स्पर्धांमध्ये तीने दहाहून अधिक सुवर्णपदाकांची कमाई केली आहे. ती तायक्वाँदोची थर्ड डॅन ब्लॅक बेल्ट खेळाडू आहे.

एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या वर्ल्ड तायक्वाँदो फेडरेशनच्या रेफ्रीच्या परीक्षेत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर हैद्राबाद येथे झालेल्या जीवन आंतरराष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेत तिने रेफ्री म्हणून भूमिका बजावली. सध्या ती रेफ्रीच्या कामासोबतच नव्या पिढीला तायक्वाँदोचे धडे देण्यासाठी विविध शाळांमध्ये प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करते आहे. येणाऱ्या काळात अल्जेनियम, नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय तायक्वाँदो स्पर्धेतील रेफ्रीसाठीही तिने नोंदणीकेली आहे.

तिची तायक्वाँदोमधील विजयी घोडदौड सुरू असतानाच तिने कॉमर्स कॉलेजमधून बी. कॉम, एम. कॉम पूर्ण केले. भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमधून कायद्याचीही पदवी मिळवली. भविष्यात ती वकिलीच्या क्षेत्रात पदार्पण 
करणार आहे.

माझी आई सुषमा राऊत व वडील अजित राऊत यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. एकाचवेळी शिक्षण व क्रीडा प्रकारात यश मिळवताना त्यांचा खूप मोठा आधार होता. नव्या पिढीला या खेळा प्रकारात पारगंत करण्यासाठी मी मार्गदर्शन करते. महाराष्ट्रातून मी त्वायक्वाँदोच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिली महिला आहे याचा अभिमान वाटतो. 
- ऐश्‍वर्या राऊत

 


​ ​

संबंधित बातम्या