विश्‍वकरंडक महिला फुटबॉल : गतविजेत्या अमेरिकेसही 'वार'ची साथ 

वृत्तसंस्था
Tuesday, 25 June 2019

मेगान रॅपिनोए हिने पेनल्टी किकवर दोन गोल करीत गतविजेत्या अमेरिकेला विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्यांनाही 'वार'ने हात दिला. स्वीडनने कॅनडास हरवून आगेकूच केली, पण फुटबॉल रसिकांना अमेरिका आणि यजमान फ्रान्स यांच्यातील उपांत्यपूर्व लढतीचे वेध लागले आहेत. 

पॅरिस : मेगान रॅपिनोए हिने पेनल्टी किकवर दोन गोल करीत गतविजेत्या अमेरिकेला विश्‍वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवून दिला. त्यांनाही 'वार'ने हात दिला. स्वीडनने कॅनडास हरवून आगेकूच केली, पण फुटबॉल रसिकांना अमेरिका आणि यजमान फ्रान्स यांच्यातील उपांत्यपूर्व लढतीचे वेध लागले आहेत. 

फ्रान्सने ब्राझीलला भरपाई वेळेत पराजित केल्यानंतर सुमारे 24 तासांत अमेरिकेने स्पेनचे कडवे आव्हान परतवले. रॅपिनोएने पहिली पेनल्टी सत्कारणी लावल्यानंतर काही वेळातच जेनिफर हेर्मोसो हिने स्पेनला बरोबरी साधून दिली. स्पेनचा भक्कम खेळ तसेच प्रतिआक्रमणे अमेरिकेची डोकेदुखीच ठरली होती, पण स्पेनची गोलक्षेत्रातील माफक चूक व्हिडीओ रेफरींनी टिपली आणि रॅपिनोए हिने 15 मिनिटे शिल्लक असताना अमेरिकेचा विजयी गोल केला. 

फ्रान्सविरुद्धच्या लढतीचे आम्हाला आतापासूनच वेध लागले आहेत. चाहत्यांचा त्यांना पाठिंबा आहे. सर्व माध्यमांचे लक्ष असेल. ही लढत नक्कीच महिला फुटबॉलच्या प्रगतीस हातभार लावेल, असे रॅपिनोए हिने सांगितले. स्पेनला लढतीनंतर "वार'चा निर्णय मान्य नव्हता. त्या वेळी फाऊल दाखवलेल्या व्हर्जिनिया टॉरेशिला हिने माझा तिला स्पर्शही झाला नव्हता. केवळ अमेरिका असल्यामुळे त्यांनी पेनल्टी किक दिली असा आरोप केला. 

दरम्यान, 38 हजार चाहत्यांच्या उपस्थितीत स्वीडनने पाचव्या मानांकित कॅनडास चकवले. गोलफलक स्तिना ब्लॅकस्टेईनस हिने स्वीडनला विजयी केल्याचे दाखवेल. प्रत्यक्षात हेदविग लिंदाही हिने 69 व्या मिनिटास कॅनडास देण्यात आलेल्या पेनल्टी किकवर गोल रोखत मोलाची कामगिरी बजावली होती. "वार'ने ही पेनल्टी किक दिली होती. "वार'मुळे स्पर्धेतील पेनल्टी किकची संख्या आताच 22 वर गेली आहे. स्वीडन आणि जर्मनी यांच्यात आगामी लढत आहे. याच दोन संघांत रिओ ऑलिंपिक सुवर्णपदकासाठी अंतिम सामना झाला होता. 

उष्णतेच्या लाटेचे स्पर्धेसमोर आव्हान 
फ्रान्समध्ये आगामी काही दिवस उष्णतेची लाट असेल. लढत रात्री 9 वाजता सुरू झाल्यानंतरही तापमान 30 अंश होते. यात आगामी दिवसात लक्षणीय वाढ होईल, असा इशारा देण्यात आला आहे. आता तापमान हेच राहिल्यास लढतीदरम्यान कूलिंग ब्रेकबाबत विचार नक्कीच होईल, असे जागतिक फुटबॉल महासंघाने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या