राज्यातील 41 ऍथलिट्‌स 'ओव्हरएज'

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

 महाराष्ट्र व भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी  डेरवण येथे झालेल्या राज्य ज्युनिअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत ऍथलिट्‌सची वैद्यकीय चाचणी (बोन टेस्ट) घेण्यात आली.

नागपूर ः "ओव्हरएज' खेळाडूंची समस्या कायमची संपविण्याच्या विडा महाराष्ट्र व भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी उचलला असून त्याच्याच एक भाग म्हणून डेरवण येथे झालेल्या राज्य ज्युनिअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत ऍथलिट्‌सची वैद्यकीय चाचणी (बोन टेस्ट) घेण्यात आली. त्यानंतर तब्बल 41 खेळाडू "ओव्हरएज' असल्याचे पत्र राज्य संघटनेने काढले आहे. 

या खेळाडूंच्या वयाच्या संदर्भातील जन्मतारखेसह अन्य इतर कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, 10 ऑक्‍टोबरपर्यंत जिल्हा सचिवांना सखोल चौकशी करून अहवाल राज्य संघटनेकडे सादर करायचा आहे. त्यानंतरच यापैकी कोणते खेळाडू वयाच्या आत आणि कोणते खेळाडू "ओव्हरएज' आहेत, हे ठरविण्यात येणार आहे. त्यानुसार या खेळाडूंची आगामी ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करायची की नाही, हेसुद्धा ठरविण्यात येणार आहे. 

नावे जाहीर करण्यात आलेल्या 41 खेळाडूंत फक्त दोन मुली आहेत. त्यापैकी एक पुण्याची तर दुसरी साताऱ्याची आहे. सर्वाधिक 11 खेळाडू पुणे जिल्ह्यातील आहेत. याच कारणामुळे या सर्व खेळाडूंची नुकत्याच अल्वर येथे झालेल्या पश्‍चिम विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली नव्हती. जिल्हा सचिवांनी सखोल चौकशी करून ठरवून दिलेल्या तारखेच्या आत अहवाल सादर केला नाही, तर डेरवण येथे वैद्यकीय चाचणीनुसार (बोन टेस्ट) खेळाडूचे जे वय दिसून येत आहे, ते ग्राह्य धरण्यात येईल, असेही राज्य संघटनेने म्हटले आहे. 

नागपूरच्या दोघांचा समावेश 
डेरवण येथे 14 वर्षे वयोगटात सहभागी झालेल्या नागपूर जिल्ह्यातील दोघांचा यात समावेश आहे. त्यापैकी एक नागपूर शहरातील दुसरा धावपटू उमरेडचा आहे. उमरेडचा धावपटू पुणे येथे सराव करतो. या धावपटूने जन्मतारखेसंदर्भात आवश्‍यक असलेली इतर कागदपत्रे जिल्हा संघटनेकडे जमा केली नसल्याची माहिती आहे. नागपुरातील धावपटूने मात्र, जन्म झाला त्या नर्सिंग होममधील कागदपत्रापासून ते आतापर्यंतची सर्व कागदपत्रे जिल्हा संघटनेकडे दिली आहेत, अशी माहिती आहे. 

"ओव्हरएज' यादी 
औरंगाबाद- 3, अकोला- 1, मुंबई शहर- 1, कोल्हापूर- 4, नगर- 3, नागपूर- 2, नाशिक- 3, पालघर- 2, पुणे- 11 (1 मुलगी), रायगड- 2, सांगली- 1, सातारा- 1 (मुलगी), मुंबई उपनगर- 4, ठाणे- 2, नांदेड- 1 


​ ​

संबंधित बातम्या