Word Cup 2019 : जोफ्रा आर्चर : एक्स, फिअर अन् सक्सेस फॅक्टरसुद्धा!

मुकुंद पोतदार
Monday, 15 July 2019

हा गोलंदाज यजमान इंग्लंडचा असला तरी ख्रिस वोक्स, मार्क वूड, लियाम प्लंकेट यांच्यापैकी सुद्धा नव्हता. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे या गोलंदाजाने केवळ आधी तीन वन-डे खेळल्या होत्या. केवळ मे महिन्यातच त्याने वन-डे पदार्पण केले होते. तीन मे रोजी वन-डे, तीन जून रोजी वर्ल्ड कप आणि 14 जुलै रोजी वर्ल्ड कप फायनलमध्ये सुपर ओव्हर टाकलेला हा गोलंदाज म्हणजे जोफ्रा आर्चर.

वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कपला प्रारंभ होण्यापूर्वी एका वेगवान गोलंदाजाची सर्वाधिक चर्चा होत होती. विशेष म्हणजे हा गोलंदाज गेल्या स्पर्धेचा मानकरी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क नव्हता. हा गोलंदाज न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, भारताचा जसप्रीत बुमरा, पाकिस्तानचे महंमद आमीर-वहाब रियाझ यांच्यापैकी कुणी एकसुद्धा नव्हता. हा गोलंदाज यजमान इंग्लंडचा असला तरी ख्रिस वोक्स, मार्क वूड, लियाम प्लंकेट यांच्यापैकी सुद्धा नव्हता. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे या गोलंदाजाने केवळ आधी तीन वन-डे खेळल्या होत्या. केवळ मे महिन्यातच त्याने वन-डे पदार्पण केले होते. तीन मे रोजी वन-डे, तीन जून रोजी वर्ल्ड कप आणि 14 जुलै रोजी वर्ल्ड कप फायनलमध्ये सुपर ओव्हर टाकलेला हा गोलंदाज म्हणजे जोफ्रा आर्चर.

त्याची इतकी चर्चा झाली की इंग्लंड आणि जगज्जेतेपद यांच्यातील निर्णायक फरक तो ठरेल इथपर्यंत म्हटले गेले. पंचविशीतील या तेजतर्रार गोलंदाजाचा 15 जणांतील आणि पुढे जाऊन प्लेईंग 11 मधील समावेश अनपेक्षित होता. चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात नामुष्की पत्करावी लागल्यानंतर इंग्लंडने केलेल्या संघाच्या पुनर्बांधणी प्रक्रियेत काल-परवा पर्यंत तो कुठेच नव्हता. डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली याने 2015 पासून चार वर्षांत 46 सामने खेळले होते. त्याच्या खात्यात 50 विकेट जमा होत्या. तो डावखुरा असूनही आर्चरला प्राधान्य देण्यात आले.

इंग्लंडच्या निवड समितीचे अध्यक्ष एड स्मिथ यांना त्यावर खुलासा करावा लागला. नव्या चेंडूवरील कौशल्यात विली मागे पडला. तो प्रामाणिक आहे, मेहनती आहे, निष्ठावान आहे, पण आम्ही आर्चरची कामगिरी पाहिली आहे. आर्चरकडे वेग आहे, बाऊन्स आहे आणि कौशल्य आहे.

World Cup 2019 : जोफ्रा आर्चर, नुसता एक्स फॅक्टर नाही तर फिअर फॅक्टर सुद्धा

आर्चर 15 जणांत आला म्हणजे 11 जणांत खेळणार हे उघड होते. त्यानुसार तो सर्व 11 सामने खेळला. स्मिथ यांनी नमूद केलेला बाऊन्सचा मुद्दा आर्चरने स्ट्राईक बोलर म्हणून सप्रमाण सिद्ध केला. पहिल्याच सामन्यात त्याने दक्षिण आफ्रिकेचा तंत्रशुद्ध फलंदाज हशीम आमला याला जेरबंद केले. आर्चरच्या बाऊन्सरवर आमला जखमी झाला. मग उपांत्य फेरीत आर्चरने ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक-फलंदाज अॅलेक्स केरी याला जायबंदी केले.

आर्चरकडे एक्स फॅक्टरच्या जोडीला फिअर फॅक्टर होता आणि तो मोक्याच्या क्षणी दिसून आला. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ यांची हुर्यो उडवून इंग्लंडच्या प्रेक्षकांनी सापापेक्षाही घातक असलेल्या कांगारूच्या शेपटावर पाय ठेवला होता. मोईन अली, जिमी अँडरसन यांचे अपवाद वगळता इंग्लंडच्या आजी-माजी खेळाडूंनी याचे समर्थनच केले होते. केरी हा तळाचा फलंदाज नसला तरी व्यापक अर्थाने कांगारूंचे शेपूट ठेचण्यात आर्चरचा बाऊन्सह निर्णायक ठरला होता.

जोफ्रा आर्चर : निधड्या छातीचा, जबरदस्त जिद्दीचा तेजतर्रार गोलंदाज

याच आर्चरने सुपर ओव्हरमध्ये कमाल केली. ट्रेंट बोल्टने 15 धावा दिल्या होत्या. त्याच्यासारख्या कसलेल्या आणि अनुभवी गोलंदाजासमोर आर्चर काय करणार ही उत्सुकता होती. बोल्टने आधी सुपर ओव्हर टाकली होती. त्यामुळे आर्चरच्या तुलनेत त्याच्यावर दडपण कमी होते. आर्चरला 15 किंवा जास्त धावा देऊन चालणार नव्हते.

सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरचे प्लॅनिंग चालले असताना कॅमेरा आर्चरवर खिळला होता. तो अगदी Cool, Chill होता. खरे तर फुटबॉल, हॉकीत टायब्रेक सुरु होण्यापूर्वी प्रचंड दडपण असते. स्टेडियममधील प्रेक्षकांमध्ये अनामिक शांतता पसरलेली असते. मैदानावर प्रशिक्षक, कर्णधार, वरिष्ठ खेळाडू यांच्यातील चर्चेला धीरगंभीर स्वरुप प्राप्त झालेले असते. हा क्षण आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्वी कधीही न पाहिलेला आर्चर मात्र रिलॅक्स होता. निम्मी लढाई त्याने तेथेच जिंकली होती.

पहिला वाईड पडूनही आणि दुसऱ्या चेंडूवर सिक्सर बसूनही आर्चरने 15 धावा दिल्या. मुळ सामना टाय झाला त्यात त्याला भोपळा सुद्धा फोडता आला नव्हता. मग सुपर ओव्हर सुद्धा टाय करण्यात आर्चरने तिसऱ्या चेंडूपासून पुढे चौकार-षटकार रोखले. मार्टिन गप्टीलसारख्या फलंदाजाला त्याने अखेरच्या चेंडूवर मोकळीक दिली नाही.

नंतर आर्चर म्हणाला की, सुपर ओव्हर मी टाकणार याची पुरेपूर खात्री होती. मी कर्णधार इयॉन मॉर्गनबरोबर थोडेसे बोललो. या आर्चरला सुपर ओव्हर टाकण्याची खात्री वाटते काय, तो मॉर्गनबरोबर थोडेसेच बोलतो काय आणि काय-काय...हे पाहिल्यावर आयपीएलची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. इथे दुसऱ्या टाईम-आऊटपासूनच क्वालीटी कंट्रोलसारख्या मिटींग सुरु होतात. खेळपट्टीच्या बाजूला सिनीयर मंडळी एकत्र येऊन काथ्याकूट करीत असतात. इंग्लंडने मात्र असे काही केले नाही. आर्चर मोहीम फत्ते करेल याची त्यांना खात्री होती, तर सुपर ओव्हर टाकण्याची खात्री असलेल्या आर्चरला स्वतःच्या क्षमतेविषयी शंका नव्हती.

स्पर्धेपूर्वी एक्स फॅक्टर, स्पर्धेदरम्यान फिअर फॅक्टर दाखवून दिलेल्या आर्चरने आपल्याकडे सक्सेस फॅक्टर सुद्धा असल्याचे सिद्ध केले. इंग्लंडच्या यशात त्याच्या सर्वाधिक 20 विकेट हेच दाखवून देतात.


​ ​

संबंधित बातम्या