ऍशेस मालिका : वॉर्नरच ठरला स्लेजिंगचा बळी; प्रेक्षकांनी दाखवले 'सॅण्ड पेपर'!
ब्रॉडने टाकलेल्या चेंडूवर वॉर्नर पायचित झाला. वॉर्नरला पंचांनी बाद दिल्यानंतर तो पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याला सॅण्ड पेपर दाखवत त्याचेच स्लेजिंग केले.
बर्मिंगहम : विश्वचषक 2019 नंतर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आज (गुरुवार) येथे सुरू झालेल्या ऍशेस मालिकेवर असणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही ऍशेस मालिका रंगणार आहे. एजबॅस्टन मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बेनक्राफ्ट्स या दोन्ही सलामीवीरांना ब्रॉडने तंबूचा रस्ता दाखवला. वॉर्नर बाद होऊन तंबूत परतत असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी चक्क ‘सॅण्ड पेपर’ दाखवत वॉर्नरला निरोप दिला. 2017 साली मार्च महिन्यामध्ये झालेल्या कसोटीत डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडू कुरतडल्याचा आरोप सिद्ध झाला होता. त्यानंतर या तिन्ही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. बंदी उठवल्यानंतर या वर्षी वॉर्नर आणि स्मिथ यांनी विश्वचषक स्पर्धेतून मैदानात पुरागमन केलं आहे. ब्रॉडने टाकलेल्या चेंडूवर वॉर्नर पायचित झाला. वॉर्नरला पंचांनी बाद दिल्यानंतर तो पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याला सॅण्ड पेपर दाखवत त्याचेच स्लेजिंग केले.
इंग्लंडच्या माऱ्यासमोर डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाही जास्त वेळ तग धरू शकला नाही. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 33 षटकात 3 बाद 104 अशी झाली होती.
Need any sandpaper for those cracks @CricketAus? #Ashes pic.twitter.com/yL20HT3sTe
— Sun Sport (@SunSport) August 1, 2019