ऍशेस मालिका : इंग्लंडने आर्चरला वगळले; ऑस्ट्रेलिया बदला घेण्यास सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 31 July 2019

दोन्ही संघांची तयारी बघता 71वी ऍशेस मालिका श्वास रोखून धरणारी ठरेल, अशी आशा जगभरातील क्रिकेटप्रेमींना आहे.

बर्मिंगहॅम : पहिल्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडने विश्वकरंडक गाजविलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला वगळले आहे. गुरुवारपासून एजबस्टन मैदानावर ही कसोटी सुरू होत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील पाच कसोटींची मालिका तीव्र चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. 

आर्चर 24 वर्षांचा आहे. विश्वकरंडकासाठी डेव्हिड विली याच्याऐवजी त्याला निवडण्यात आले. त्याने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवीत इंग्लंडतर्फे सर्वाधिक 20 विकेट घेतल्या. स्पर्धेदरम्यान दुखापतीचा त्रास होऊनही खेळल्याचे त्याने अलीकडेच सांगितले होते. त्याच्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड किंवा ख्रिस वोक्‍स यांच्यापैकी एकाला वगळले जाईल, अशी शक्‍यता होती, मात्र त्याला शंभर टक्के तंदुरुस्त होता यावे या उद्देशाने घेण्यात आले नाही. तसे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट याने सांगितले. 
37 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, ब्रॉड आणि वोक्‍स यांच्या जोडीला फिरकी गोलंदाज मोईन अली असा इंग्लंडचा मारा असेल. अँडरसनला पोटरीच्या दुखापतीने सतावले होते; पण तो तंदुरुस्त झाला आहे. 

ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका जास्त महत्त्वाची आहे. विश्वकरंडकात उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभूत व्हावे लागले. यामुळे कांगारू डिवचले गेले आहेत. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणामुळे त्यांची नाचक्की झाली. त्यानंतर मायदेशात भारताविरुद्ध त्यांना कसोटी मालिका गमवावी लागली. 

ऑस्ट्रेलियाने मेंटॉर म्हणून रिकी पॉंटिंग आणि सल्लागार म्हणून स्टीव वॉ या दिग्गज कर्णधारांना आमंत्रित केले आहे. डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने शतके ठोकण्याचा संकल्प सोडला आहे. तंत्रशुद्ध फलंदाज उस्मान ख्वाजा याने आक्रमक खेळ करावा, अशी अपेक्षा पॉंटिंगने व्यक्त केली आहे. 

ऑस्ट्रेलिया गोलंदाजीत मिचेल स्टार्क, ज्याने विश्वकरंडकात विक्रमी विकेट घेतल्या, त्याला वगळू शकते. कांगारूंनी निवड चाचणी सराव सामना घेऊन संघ निवडला आहे. त्यांनी सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठीच हे नियोजन केले होते. 

दोन्ही संघांची तयारी बघता 71वी ऍशेस मालिका श्वास रोखून धरणारी ठरेल, अशी आशा जगभरातील क्रिकेटप्रेमींना आहे.


​ ​

संबंधित बातम्या