चिंकी यादवकडून भारताला अकरावा ऑलिंपिक कोटा

वृत्तसंस्था
Friday, 8 November 2019

- मध्य प्रदेश क्रीडा विभागात इलेक्‍ट्रिशियनची मुलगी असलेल्या चिंकी यादवने आशियाई नेमबाजी स्पर्धेत ऑलिंपिक पात्रतेचा वेध घेतला.

- ऑलिंपिक पात्रता मिळवली, पण तिला पदकापासून दूर राहावे लागले. 

मुंबई - मध्य प्रदेश क्रीडा विभागात इलेक्‍ट्रिशियनची मुलगी असलेल्या चिंकी यादवने आशियाई नेमबाजी स्पर्धेत ऑलिंपिक पात्रतेचा वेध घेतला. तिने 25 मीटर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठत ऑलिंपिक पात्रता मिळवली, पण तिला पदकापासून दूर राहावे लागले. 
चिंकीने पात्रता फेरीत 588 गुणांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. तिने अखेरच्या फेरीत अचूक शंभर गुणांचा वेध घेतला होता. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठपैकी चौघींनी यापूर्वीच पात्रता मिळवली होती. त्यामुळे अंतिम फेरी गाठलेल्या चिंकीसह अन्य चौघींना ही पात्रता मिळाली. याच प्रकारात राही सरनोबतने म्युनिच विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारताची पहिली ऑलिंपिक पात्रता मिळवली होती. 
अंतिम फेरीत चिंकीला 116 गुणांसह सहाव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. "ऑलिंपिक पात्रता मिळवल्यामुळे मी किती खूश आहे, हे सांगणे अवघड आहे. पात्रता फेरीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केल्याचेही नक्कीच समाधान आहे. या कामगिरीचे श्रेय माझ्या सर्व मार्गदर्शकांना विशेषतः जसपाल राणा यांना आहे,' असे चिंकीने सांगितले. चिंकीच्या सहकारी अन्नू राज सिंग (575) आणि नीरज कौर (572) या अंतिम फेरीपासून खूपच दूर राहिल्या. त्याच वेळी सरावाच्या स्पर्धेत खेळताना राहीने 589; तर मनू भाकरने 584 गुणांचा वेध घेतला. 
 


​ ​

संबंधित बातम्या