आशियाई टेटे स्पर्धेत साथीयन उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था
Saturday, 21 September 2019

-जी साथीयन याने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

-भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी तब्बल 43 वर्षांनंतर केली आहे.

-साथीयनने हा लक्षणीय विजय केवळ 22 मिनिटांत मिळवला. 

मुंबई -  जी साथीयन याने आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी तब्बल 43 वर्षांनंतर केली आहे. साथीयनने हा लक्षणीय विजय केवळ 22 मिनिटांत मिळवला. 
जपानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत साथीयनने उत्तर कोरियाच्या ऍन-जी याला 11-7, 11-8, 11-6 असे हरवले. जागतिक क्रमवारीत तिसाव्या असलेल्या साथीयनसमोर आता चीनचा लीन गाओयुन हा प्रतिस्पर्धी असेल. यापूर्वी 1976 च्या स्पर्धेत दिल्लीच्या सुधीर फडके यांनी चिनी प्रतिस्पर्ध्यास हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. ही स्पर्धा प्यॉंगयांग येथे झाली होती. आता त्यानंतर भारतास हे यश लाभले आहे. 
आशियाई स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठल्याचा नक्कीच आनंद आहे. आतापर्यंतची स्पर्धेतील वाटचाल नक्कीच सुखावणारी आहे. मात्र या कामगिरीवर नक्कीच समाधानी नाही. यापेक्षा सरस कामगिरीचे लक्ष्य आहे, असे साथीयनने सांगितले. उपांत्यपूर्व लढतीच्या वेळी माझ्यावर कोणतेही दडपण नसेल. सर्व दडपण चौथ्या मानांकन असलेल्या चीनच्या प्रतिस्पर्ध्यावर असेल, असेही तो म्हणाला. पुरुष दुहेरीच्या चुरशीच्या लढतीत साथीयन-शरथ कमलला गाओयान आणि त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. हा अनुभवही मोलाचा असेल, असेही साथीयन म्हणाला. 
दरम्यान, अँथनी अमलराज आणि हरमीत देसाईला तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. महिलांच्या स्पर्धेत आयहिका मुखर्जी ऑलिंपिक विजेत्या जिंग निंगविरुद्धच्या चार गेमच्या लढतीत पराभूत झाली. अर्चना कामत, सुतीर्था मुखर्जी, मधुरिका पाटकर, तसेच मनिका बत्रा दुसऱ्या फेरीत पराभूत झाले. 
 


​ ​

संबंधित बातम्या