World Cup 2019 : फिंच-वॉर्नरच्या शतकी सलामीनंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला 'ब्रेक'
कर्णधार ऍरॉन फिंचचे शतक आणि त्याने वॉर्नरसह केलेली शतकी सलामी यामुळे त्रिशतकी धावांचे लक्ष्य समोर ठेवणाऱ्या कांगारूंची झेप इंग्लंडने 285 धावांपर्यंत रोखली. 1 बाद 173 वरून ऑस्ट्रेलियाच्या डावाला हा ब्रेक लागला. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला पुन्हा एकदा अपयश आल्याने त्यांचे आव्हान मर्यादित राहिले.
वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस् :कर्णधार ऍरॉन फिंचचे शतक आणि त्याने वॉर्नरसह केलेली शतकी सलामी यामुळे त्रिशतकी धावांचे लक्ष्य समोर ठेवणाऱ्या कांगारूंची झेप इंग्लंडने 285 धावांपर्यंत रोखली. 1 बाद 173 वरून ऑस्ट्रेलियाच्या डावाला हा ब्रेक लागला. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला पुन्हा एकदा अपयश आल्याने त्यांचे आव्हान मर्यादित राहिले.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील ऍशेस म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या लढतीत पहिल्या डावात कमालीची चुरस झाली. कधी ऑस्ट्रेलियाचे; तर कधी इंग्लंडचे पारडे जड होत होते. चेंडू आणि बॅटमध्ये तेवढाच संघर्ष झाला. आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. सुरवातीच्या स्वैर माऱ्यावर इंग्लंड गोलंदाजांना दुसऱ्या टप्प्यात नियंत्रण ठेवण्यात यश आले. लेगस्पिनर आदील रशिदचा अपवाद वगळता सर्वच गोलंदाजांनी विकेट मिळण्यासाठी योगदान दिले.
Australia finish their innings with 285/7.
Who will be the happier of the two sides?#ENGvAUS | #CWC19 pic.twitter.com/ItqJoje2cK
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 25, 2019
काल रात्री पडलेला पाऊस आणि सकाळपासून असलेले ढगाळ वातावरण लक्षात घेऊन नाणेफेक जिंकून प्रथम कुणीही गोलंदाजीस प्राधान्य देणार हे निश्चित होते. इंग्लंड कर्णधार मॉर्गनने हेच केले. अर्थात, पहिल्या 22 षटकापर्यंतच्या खेळात आपला निर्णय चुकला असल्याची जाणीव त्याला होत होती. कारण फिंच आणि वॉर्नर यांनी अधिकारवाणीने टोलेबाजी केली; पण दोघेही शतक आणि अर्धशतक करून लगेचच बाद झाले. येथेच इंग्लंड गोलदाजांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास सुरवात केली. वेगवान गोलंदाज अयपशी ठरत असताना ऑफस्पिनर मोईन खान मदतीला आला आणि त्याने वॉर्नरला बाद करून पहिले यश मिळवले.
उस्मान ख्वाजा पुन्हा एकदा फायदा घेऊ शकला नाही. त्यानंतर शतक केल्यानंतर फिंचची विकेट आर्चरने मिळवली. ही त्याची सामन्यातली एकमेव विकेट ठरली. हे दोघे बाद झाले तेव्हा स्टिव स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल एकाच वेळी दोन नवे फलंदाज मैदानात होते. इंग्लंडकडे ही चांगली संधी होती; पण मॅक्सवेलने आपल्या "स्टाईल'मध्ये बॅट फिरवण्यास सुरवात केली. एक चौकार आणि एक षटकारही मारला; पण त्याची ही खेळी अल्पजीवी ठरली.
स्मिथ एका बाजूने उभा असल्याने ऑस्ट्रेलियाला चिंता नव्हती. एव्हाना साडेपाच धावांची सरासरी अंतिम षटकांत उंचावून त्रिशतकी मजल मारण्याचे त्यांचे ध्येय होते; पण स्मिथबरोबरचा ताळमेळ चुकला आणि स्टॉइनिस धावचीत झाला. त्यानंतर गिअर बदलण्याच्या प्रयत्नात स्मिथची गाडी 38 धावांवर बंद पडली आणि तेथेच त्यांचे मोठ्या धावसंख्येचे स्वप्न विरळ झाले. ऍलेक्स कॅरीने अंतिम षटकांत 27 चेंडूत 38 धावांचा पल्ला गाठला आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना 285 धावांचे पाठबळ मिळाले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 7 बाद 285.
(ऍरॉन फिंच 100 -116 चेंडू, 11 चौकार, 2 षटकार, डेव्हिड वॉर्नर 53 -61 चेंडू, 6 चौकार, स्टिव स्मिथ 38 -34 चेंडू, 5 चौकार, ऍलेक्स कॅरी 38 -27 चेंडू, 5 चौकार, ख्रिस वोक्स 10-0-46-2, जोफ्रा आर्चर 9-0-56-1, बेन स्टोक्स 6-0-29-1, मोईन अली 6-0-42-1).