बॅडमिंटनपटू आरतीला हवे मदतीचे बळ

मतीन शेख
Monday, 5 August 2019

सध्या स्वित्झर्लंड येथे होत असलेल्या पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारताकडून आरती पाटील हिची निवड झाली आहे. मात्र, आर्थिक कारणावरून ही संधी हुकते की काय..? अशी वेळ आरती व तिच्या आई-वडिलांवर आली आहे. आरतीला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ होण्यासाठी समाजातील दात्यांनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कोल्हापूर - शारीरिक अपंगत्वावर मात करत उचगाव (ता. करवीर) येथील आरती जानोबा पाटील हिने जिद्दीने संघर्षाचा पर्याय निवडला. शालेय वयातच बॅडमिंटन या खेळाला आपलसे केले व तिच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. ती मोठ्या तडफेने बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरली. जिद्दीच्या जोरावर जिल्हा स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत तिने मजल मारली आहे. सध्या स्वित्झर्लंड येथे होत असलेल्या पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारताकडून तिची निवड झाली आहे. मात्र, आर्थिक कारणावरून ही संधी हुकते की काय..? अशी वेळ आरती व तिच्या आई-वडिलांवर आली आहे. आरतीला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ होण्यासाठी समाजातील दात्यांनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

जन्मताच आरतीचा डावा हात नियतीने हिरावून घेतला. अपंग म्हणून तिच्या पदरात अनेकदा उपेक्षा, कुचेष्टा पडली; परंतु ती लढत राहिली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने हे यशोशिखर गाठले आहे. तिचे वडील व भाऊ गवंडी काम करतात, तर आई शिवण काम करते. आर्थिक जम बसलेला नसतानासुद्धा त्यांनी जन्मजात एका हाताने अपंग असलेल्या आरतीकडे दुर्लक्ष केले नाही वा मुलगी म्हणून दुजाभाव केला नाही. 

भारताबरोबरच जपान, दुबई, डेन्मार्क, युगांडा येथे आपल्या खेळाचा करिष्मा दाखवत तिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पदके आपल्या नावे केली आहेत. सध्या ती जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी आहे. नुकत्याच तुर्की व ॲरिश येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेला पैशाअभावी ती जाऊ शकली नाही, त्यामुळे तिचे गुणांकन घसरले आणि शासकीय कोट्यातून होणाऱ्या प्रवास दौऱ्यातील तिचे नाव वगळले.

कोल्हापुरात सरावाची सोय होत नसल्याने सध्या ती सोलापूरच्या सुनील देवांग बॅडमिंटन ॲकॅडमीत मोफत प्रशिक्षण घेत आहे. भारतीय पॅरा ऑलिम्पिक कमिटीद्वारे स्वित्झर्लंड येथे १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीप’साठी तिची निवड झाली आहे. परंतु, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ती या स्पर्धेत मुकते की काय? अशी स्थिती आहे. कारण या स्पर्धेसाठी तीन लाख इतका खर्च येणार आहे. हा खर्च तिच्या कुटुंबीयांना पेलणारा नाही. तिला भारतासाठी सुवर्णपदक जिंकत ऑलिम्पिकचा मार्ग जवळ करत कोल्हापूरचे नाव झळकवायचे आहे. समाजातील दानशूर, सेवाभावी संस्था यांनी तिला आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन गवंडी काम करणारे तिचे वडील जानोबा पाटील यांनी केले आहे. 

खूप संघर्षातून या खेळात मी प्रावीण्य मिळवले. परदेशात जेवणाला खर्च होतो म्हणून अनेकदा मी जेवले देखील नाही, तरीही पदक जिंकले. आता मात्र घरच्यांचा नाईलाज झाला आहे, ते खर्च करू शकत नाहीत. चांगली मदत मिळाली तरच माझे जागतिक विजेता होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. 
- आरती पाटील,
आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू


​ ​

संबंधित बातम्या