विजेतेपदाचा दुष्काळ कायम; ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीतच सिंधूची हार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 March 2021

या लढतीतही पहिल्या गेममध्ये प्रतिकार केल्यावर सिंधूला दुसऱ्या गेममध्ये क्वचितच आव्हान निर्माण करता आले.

मुंबई : पी. व्ही. सिंधूचा जागतिक विजेतेपदानंतरचा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विजेतेपदाचा दुष्काळ पुन्हा लांबला. कॅरोलिन मरिन, तई झु यिंग यांच्या अनुपस्थितीत ऑल इंग्लंडचे विजेतेपद जिंकण्यात पी व्ही सिंधू अपयशी ठरली. किंबहुना पॉरनपावी चॉचूवाँग हिने आपण सिंधूची नवी डोकेदुखी होणार असल्याचेच दाखवले. उपांत्यपूर्व फेरीतील संघर्षपूर्ण विजयानंतर सिंधूची उपांत्य फेरी निश्‍चित मानली जात होती, पण जागतिक क्रमवारीत सातवी असलेली सिंधू तिच्यापेक्षा चार क्रमांकाने खाली असलेल्या चॉचूवाँगविरुद्ध 17-21, 9-21 अशी पराजित झाली. दोन आठवड्यांपूर्वी स्विस ओपनच्या अतिम लढतीत सिंधूने कॅरोलिन मरिनविरुद्धचा दुसरा गेम एकतर्फी गमावला होता, याचीच पुनरावृत्ती झाली. या लढतीतही पहिल्या गेममध्ये प्रतिकार केल्यावर सिंधूला दुसऱ्या गेममध्ये क्वचितच आव्हान निर्माण करता आले.

यशस्विनीचा 'सुवर्ण' वेध; ‘भारतमाता की जय’ म्हणत साजरा केला आनंद

सिंधूची उपांत्यपूर्व लढत भारतीय वेळेनुसार शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता संपली होती, त्यानंतर सतरा तासात तिला कोर्टवर उतरावे लागले होते. मात्र त्यामुळे सिंधूच्या निष्प्रभ खेळाचे समर्थन होत नाही. जगज्जेतीच्या आक्रमणाला वेसण घालण्यात प्रतिस्पर्धी यशस्वी ठरल्यावर सिंधू फारसे काही करू शकत नाही हेच पुन्हा दिसले. दुसऱ्या गेममध्ये सिंधू सावरणार असे वाटत असताना शटल थोडक्‍यात बाहेर अथवा आत राहिले आणि त्यामुळे सिंधूची लय बिघडत गेली आणि भारताचा ऑल इंग्लंड विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला.

ऑलिंपिकसाठी 90 हजार परदेशी रहिवाशांची मर्यादा

सिंधूचे चॉचूवाँग हिला बेसलाईनवर ठेवण्याचे प्रयत्न पार विफल ठरले. शटलवर पूर्ण नियंत्रण राखता येत नसल्याने सिंधूसमोरील आव्हान अवघड झाले होते. त्याचवेळी चॉचूवाँगच्या कोर्टवरील जबलदस्त हालचाली तसेच शटलचा अंदाज सिंधूसाठी त्रासदायक ठरला. पहिल्या गेममध्ये 6-9 पिछाडीवरून लाईनचा अंदाज चुकल्याने पिछाडी वाढली. 7-14 पिछाडीनंतरचा प्रतिकार क्रॉस कोर्ट स्मॅशने रोखला गेला. दुसऱ्या गेममघ्ये सिंधूला कोर्टवर जास्तच नाचवले.

चॉचूवाँगची वाढती डोकेदुखी
    चॉचूवाँगचा सिंधूविरुद्धच्या सहा लढतीतील दुसरा विजय
    सिंधूचे चारपैकी दोन विजय दोन गेममध्ये.
   2020  मध्ये चॉचूवाँगने कॅरोलिन मरिनला तिच्या मायभूमीत हरवून पहिले विजेतेपद जिंकले होते.
    जागतिक क्रमवारीत अकरावी असलेल्या चॉचूवाँगची वेगाने प्रगती


​ ​

संबंधित बातम्या