साईना, श्रीकांतच्या पात्रतेसाठी बॅडमिंटन संघटनेची रॅली

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 May 2021

ऑलिंपिक क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेतील साईना नेहवाल, किदांबी श्रीकांतला सहभागाची संधी मिळावी यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने पत्रव्यवहाराच्या रॅलीज सुरू केल्या आहेत. मलेशियन स्पर्धा रद्द झाली आहे.

मुंबई - ऑलिंपिक क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेतील साईना नेहवाल, किदांबी श्रीकांतला सहभागाची संधी मिळावी यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने पत्रव्यवहाराच्या रॅलीज सुरू केल्या आहेत. मलेशियन स्पर्धा रद्द झाली आहे. सिंगापूर स्पर्धेबाबत अनिश्चितता आहे, या परिस्थितीत पात्रतेची संधी दुरावणाऱ्या खेळाडूंचे काय, अशी विचारणा भारताने जागतिक बॅडमिंटन संघटनेस केली आहे. 

इंडिया ओपनपाठोपाठ मलेशियातील सुपर ७५० स्पर्धाही रद्द झाली. पी व्ही सिंधू, बी साई प्रणीत यांचा एकेरीतील तसेच चिराग शेट्टी - सात्विकसाईराज यांचा दुहेरीतील प्रवेश जवळपास निश्चित आहे, पण साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत, तसेच महिला आणि मिश्र दुहेरीतील प्रवेश सध्याच्या क्रमवारीनुसार अवघड आहे. सिंगापूर स्पर्धेनंतर अंतिम पात्र खेळाडू जाहीर होणार आहेत. सिंगापूरही स्पर्धा रद्द झाल्यास साईना, श्रीकांतसह भारतीयांची संधी दुरावेल. त्यामुळे भारतीय बॅडमिंटन संघटनेने पत्रव्यवहार सरू केला आहे. 

सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यास पात्रता स्पर्धा रद्द होण्याची शक्यता लक्षात घ्यावी लागेल. मात्र साईना, श्रीकांत तसेच अन्य काही खेळाडूंनाही संधी आहे. या परिस्थितीत जागतिक महासंघ काय निर्णय घेणार याची विचारणा मी जागतिक महासंघाचे सचिव थॉमस लुंड यांना केली आहे, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव अजय सिंघानिया यांनी सांगितले.

मलेशियात मेच्या अखेरीस होणारी स्पर्धा रद्द झाली आहे. सिंगापूरमधील स्पर्धा १ ते ५ जून दरम्यान आहे. सिंगापूरने यापूर्वीच भारताबरोबरील हवाई संपर्क बंद केला आहे. आता २१ दिवसांचे सक्तीचे विलगीकरण आणि प्रवासाबाबतचे प्रश्न यामुळे भारताचा सहभाग अवघड झाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या