ऑलिंपिक विजेती मरिन आणि मोमोता दिल्लीत खेळणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 April 2021

ऑलिंपिक विजेती कॅरोलिन मरीन तसेच जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला केंतो मोमोता इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपला कस पणास लावतील.

मुंबई - ऑलिंपिक विजेती कॅरोलिन मरीन तसेच जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला केंतो मोमोता इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपला कस पणास लावतील. प्रेक्षकांविना होणारी ही स्पर्धा ११ ते १६ मेदरम्यान नवी दिल्लीत होणार आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या पात्रता स्पर्धेत स्थान असलेल्या या स्पर्धेत चीनसह ३३ देशांतील २२८ खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. त्यात सर्वाधिक भारताचे ४८ (२७ महिला आणि २१ पुरुष) खेळाडू आहेत; तर मलेशियाचे २६ (१० महिला आणि १६ पुरुष) आणि चीनचे १० खेळाडू (४ महिला आणि ६ पुरुष) खेळाडू असतील.

तीन वेळची जागतिक विजेती कॅरोलिन मरिन, अकेन यामागुची, जागतिक विजेती पी. व्ही. सिंधू, कोरिया अॅन से यंग, थायलंडची पोर्नपावी चोचुवाँग यांचा महिला एकेरीत सहभाग असेल; तर पुरुष एकेरीत मोमोतासह गतविजेता व्हिक्टर अॅक्सेलसेन, अँडर्स अँतॉनसेन, ऑल इंग्लंड विजेता झ्ली जिआ ली हे खेळणार आहेत. पुरुष एकेरीत भारताची मदार किदांबी श्रीकांत, पारुपली कश्यप, बी. साई प्रणीत, एच. एस. प्रणॉय यांच्यावर असेल. स्पर्धेचा ड्रॉ २० एप्रिलला जाहीर होईल.

सुरक्षित स्पर्धेसाठी स्पर्धेच्या वेळी प्रसिद्धिमाध्यमांनाही प्रवेश नाही दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मध्य पूर्व तसेच युरोपीय देशांतील खेळाडूंसाठी सात दिवसांचे विलगीकरण. त्यांना ३ मेपर्यंत दाखल होण्याची सूचना अन्य देशांतील स्पर्धकांना ६ मेपर्यंत दाखल होणे बंधनकारक, त्यांचे विलगीकरण चार दिवसांचे दिल्लीत दाखल झाल्यावर प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार

स्पर्धेपूर्वी ९ मे रोजी चाचणी तसेच स्पर्धेदरम्यान १४ मे रोजी चाचणी इंडिया ओपन स्पर्धेद्वारे भारतीय बॅडमिंटनची प्रगती साधणे हाही उद्देश आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उपस्थिती आवश्यक आहे; मात्र सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आम्हाला ही स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात घेणे भाग पडले आहे.
- अजय सिंघानिया, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव


​ ​

संबंधित बातम्या