एका कथानायकाची एग्झिट…

प्रवीण टोकेकर
Thursday, 29 July 2021

पन्नास-साठच्या दशकांत देशाच्या सर्वच क्षेत्रातील पायाभरणीचे काम सुरू असताना क्रीडांगणावरही काही नवे घडू पाहात होते. नवी क्रीडा संस्कृती आकाराला येत होती, त्यात वाटा उचलणाऱ्यांमध्ये नंदू नाटेकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशातील बॅडमिंटन आणि नाटेकर हे तर समीकरणच झाले आहे.

पन्नास-साठच्या दशकांत देशाच्या सर्वच क्षेत्रातील पायाभरणीचे काम सुरू असताना क्रीडांगणावरही काही नवे घडू पाहात होते. नवी क्रीडा संस्कृती आकाराला येत होती, त्यात वाटा उचलणाऱ्यांमध्ये नंदू नाटेकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशातील बॅडमिंटन आणि नाटेकर हे तर समीकरणच झाले आहे.

पोलो कॉलरचा शुभ्र शर्ट आणि पीळदार मनगटे असलेला, मंद स्मिताची पखरण करत बोलणारा वसंता किंवा दिलिप…बॅडमिंटन कोर्टवरल्या त्याच्या रुबाबदार हालचाली आणि त्याच्या चपळ तारुण्यावर मनोमन आशक झालेली कमल…केसांची झुलपे मागे सारत चतुर संभाषण साधण्याची लकब, आणि हातातली बॅडमिंटनची रॅकट खेळवत शालीन आमंत्रण देण्याची धिटाई दाखवणारा तो कथानायक…या आणि असल्या स्वप्नदृश्यांनी विनटलेल्या ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या भल्याभल्यांना भुरळ घालत होत्या, तो जमानाच्या जमाना आता काळाच्या पडद्याआड गेला. आत्मविश्वासानं भारलेला, तारुण्यानं घमघमणारा, देखणा, हुशार, समंजस असा स्वप्नातल्या राजपुत्रासम असलेला हा नायक एरवी कथाकादंबऱ्या आणि फारतर चित्रपटा-नाटकातच सापडावा. फडक्यांच्या कादंबरीतल्यासारखा नायक वास्तवात कुठं असेल का? हा असंख्य मराठी युवक युवतींच्या मनातला प्रश्न खरं तर नंदू नाटेकरांनी सहज सोडवला होता…

नंदू नाटेकर हे खरोखर, अगदी वास्तवातले हिरो होते. चित्रपट-नाटके आणि कथा- कादंबऱ्यांमधले नायक जणू काही त्यांच्याच व्यक्तिमत्त्वावर बेतल्यागत वाटत असत. वर उल्लेखिलेल्या फडक्यांच्या कादंबऱ्यांमधला नायक तर सही सही नाटेकरांसारखाच दिसत असे. तरुण युवतींच्या मनाला भुरळ घालील, असं व्यक्तिमत्त्व फडक्यांनी कादंबरीत उतरवलं, नाटेकर तसे प्रत्यक्षात दिसायचे. नाटेकर नुसते हिरोसारखे दिसायचे, असं नाही तर त्यांचं कर्तृत्त्वही एखाद्या कादंबरीच्या नायकाला शोभेल असंच होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा स्वतंत्र भारताचा पहिला वहिला चँपियन होता. -अंतर्बाह्य विजेता!

पन्नाशी-साठीची दशकं हा आपल्या देशासाठी पुनरुत्थानाचा काळ होता. देश नुकताच स्वतंत्र झाला होता, आणि पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतलेल्या पं. नेहरुं आणि त्यांच्या टीमनं नव्या भारताच्या उभारणीसाठी विविध क्षेत्रात एकाच वेळी धडपड सुरु केली होती. धरणं, रस्ते, विद्यापीठं, इस्पितळं हे तर उभं करायचंच होतं, मुख्य म्हणजे या देशाचं चारित्र्य उभं करण्याचं आव्हान पुढ्यात होतं. आव्हान अवघड होतं हे खरंच, कारण सगळ्याच गोष्टी काही सत्ताकारणातून घडवता येत नाहीत. वेगवेगळ्या क्षेत्रात आदर्श निर्माण होण्याची नितांत गरज त्यासाठी असते. नंदू नाटेकर नावाच्या व्यक्तिमत्त्वानं काही अंशी ही गरज भरुन काढली.

परवा वयाच्या ८८ व्या वर्षी नंदू नाटेकर गेले. ज्या पुण्यात बॅडमिंटन या खेळाचा जन्म झाला, असं म्हणतात, त्या पुण्यातच बॅडमिंटनचा हा महासितारा मावळला. पीव्ही सिंधु, साइना नेहवाल, किदंबी श्रीकांत, पुलेला गोपीचंद यांच्यासारख्या ‘पुढीलां’नी भारतीय बॅडमिंटनची पताका दिमाखात फडकत ठेवली, नव्हे, उंच उंच नेली. त्या पताकेचा पहिला धनी नंदू नाटेकर होते, ही बाब डोळेआड करणं कृतघ्नपणाचं ठरेल. कुठलंही प्रशिक्षण न घेता नाटेकरांनी बॅडमिंटनमध्ये शंभरेक स्पर्धा जिंकल्या. ऑल इंग्लंड क्लब बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद हे त्याकाळी गुलबकावलीच्या फुलासमान होतं. त्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारुन आलेला हा गडी. पुढे त्यांचाच आदर्श गिरवत मोठा झालेल्या प्रकाश पदुकोणनं तीन वेळा ही स्पर्धा जिंकून दाखवली. आता तर भारतीय बॅडमिंटन हा क्रीडाक्षेत्रातला एक दबदब्याचा विषय झाला आहे. परंतु, हे सगळं घडलं, नाटेकरांच्या निवृत्तीनंतर. आत्ता पन्नाशी ओलांडलेले जन्मलेही नव्हते, तेव्हा बॅडमिंटनपटू नंदू नाटेकरांची देदिप्यमान कारकीर्द संपूनही गेली होती. त्यांनी शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली ती १९६५ मध्ये. त्याकाळात नाटेकरांची लोकप्रियता विलक्षण वाटायची. कविवर्य वसंत बापटांच्या भाषेत वर्णन करायचं तर ‘गोरागोमटा’ आणि ‘छाकटा’ तरुण खेळाडू, असंच नाटेकरांचं रुप होतं. वागणं अतिशय सभ्य आणि शालीन होतं. बॅडमिंटन कोर्टवर त्यांचा खेळ बघायला लोक लांब लांबून येत असत. त्यातही सुरेश गोयल आणि नाटेकर यांची लढत ही पर्वणी ठरायची.

जुगलबंदीच म्हणायला हवी. नाटेकरांचे फटके पाहात डोळ्यांचं पारणं फिटेतोवर सुरेश गोयल त्यांच्यासारखीच ग्रेसफुल फटकेबाजी सुरु करायचा. विरोधकालाच आदर्श मानत त्याच्यासारखा खेळ करणं मनोहारी असे. हे बघणं ‘अनुभवलेले’ काही लोक अजूनही हयात आहेत.

जय बॅडमिंटन!
त्याकाळात त्यांना ब्रिलक्रीमच्या जाहिरातील झळकण्याचा मान मिळाला तो काही उगीच नव्हे. एवढं देखणं मॉडेल फिल्मी दुनियेतही मिळालं नसतं. सहाशे रुपये आणि तीन ब्रिलक्रीमच्या बाटल्या एवढ्या मानधनावर त्यांना जाहिरात करायची गळ घालण्यात आली होती. नाटेकरांचं व्यक्तिमत्त्वच तसं होतं. १९५६ साली मलेशियातली सलेंगर स्पर्धा जिंकून ते मायदेशी परत आले, तेव्हा हिरोसारखंच त्यांचं स्वागत झालं. त्याच सुमारास ते एकदा काही निमित्तानं पू. विनोबा भावे यांना भेटायला गेले. तेव्हा विनोबाजींचं मौनव्रत चालू होतं. पण नाटेकरांना बघून त्यांनी आपलं व्रत बाजूला ठेवलं आणि हात वर करुन चक्कओरडले : ‘जय बॅडमिंटन!’ विनोबाजींचं मौन मोडायला लावणारी कुठली जादू नाटेकरांमध्ये होती, कोण जाणे.

नंदू नाटेकरांनी एका मातब्बर तेल कंपनीत मोठ्या हुद्यावर दीर्घकाळ नोकरी केली. त्यांना त्याही क्षेत्रातलं भरपूर आणि अद्ययावत ज्ञान होतं. संगीत हा मात्र त्यांचा संपूर्णत: खाजगी ठेवा होता. सुरेल लकेरी गुणगुणत नाटेकर सुरावटींच्या दुनियेत अहोरात्र रमलेले असत.‘‘गेम संपला की मी सगळं विसरायचो, आणि गाणी ऐकायला लागायचो’’ असं ते सांगायचे. आयुष्याचे संध्यारंग टिपतानाही त्यांना संगीताची साथ होती. लौकिक, पद, प्रसिद्धी यांच्या पलिकडलं हे व्यक्तिमत्त्व. एवढं यश लाभूनही त्यांना पद्मश्रीसारखा पुरस्कार मात्र कधी मिळाला नाही. ‘‘असं का?’’ असं विचारल्यावर ते प्रसन्न हसून म्हणायचे, ‘‘ कधी विचारच नाही केला रे त्याचा!’’ टोकियोत ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहे. तिथं भारताचं आव्हान पीव्ही सिंधूनं अजूनतरी कायम ठेवलं आहे. त्या आव्हानामागे भारतीय बॅडमिंटनची तीन-चार पिढ्यांची समृद्ध परंपरा उभी आहे. क्रीडा क्षेत्राप्रमाणेच संगीताचीही आवड त्यांना होती. संगीत क्षेत्रात घराणी असतात, तसंच बॅडमिंटनचं घराणं हे नंदू नाटेकरांपासून सुरु झालंय, ही जाणीव ठेवायलाच हवी.


​ ​

संबंधित बातम्या