साईना, श्रीकांतची ऑलिंपिक पात्रता संकटात
साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतची ऑलिंपिक पात्रता संकटात आली आहे. प्रवास निर्बंधामुळे भारतीय बॅडमिंटनपटू मलेशियातील स्पर्धेत खेळू शकणार नाहीत.
मुंबई - साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतची ऑलिंपिक पात्रता संकटात आली आहे. प्रवास निर्बंधामुळे भारतीय बॅडमिंटनपटू मलेशियातील स्पर्धेत खेळू शकणार नाहीत, त्यामुळे ऑलिंपिक पात्रतेसाठी आवश्यक असलेले मानांकन उंचावण्याची संधी साईना, श्रीकांतला लाभणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
मलेशियन बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटनपटूंना १० मेपर्यंत दाखल होणे आवश्यक आहे. ज्याद्वारे विलगीकरण पूर्ण करून ते स्पर्धेत खेळू शकतील, पण भारतीय बॅडमिंटनपटू मलेशियाच्या प्रवास निर्बंधामुळे जाऊ शकणार नाहीत, त्यामुळे संघाला माघार घ्यावी लागेल, असे क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
भारतीय बॅडमिंटन संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यास दुजोरा देण्यास नकार दिला आहे. मलेशियन स्पर्धेला ऑलिंपिक पात्रतेचा दर्जा आहे. त्यातून आपला संघ कसा माघार घेऊ शकेल. संघास पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.