सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धाही रद्द झाल्यामुळे साईना, श्रीकांतचे ऑलिंपिक स्वप्न भंगणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 May 2021

साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतच्या टोकियो ऑलिंपिक क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. इंडिया ओपनपाठोपाठ, मलेशिया ओपन आणि आता सिंगापूर ओपन रद्द झाल्यामुळे साईना आणि श्रीकांतला पात्रतेसाठी स्थान उंचावणे अवघडच होणार आहे.

मुंबई / नवी दिल्ली - साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतच्या टोकियो ऑलिंपिक क्रीडा बॅडमिंटन स्पर्धेत खेळण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. इंडिया ओपनपाठोपाठ, मलेशिया ओपन आणि आता सिंगापूर ओपन रद्द झाल्यामुळे साईना आणि श्रीकांतला पात्रतेसाठी स्थान उंचावणे अवघडच होणार आहे.

सिंगापूर बॅडमिंटन संघटना तसेच जागतिक बॅडमिंटन महासंघाने सिंगापूर ओपन रद्द झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. मलेशिया ओपन रद्द झाल्यापासून सिंगापूर ओपनही रद्द झाल्याचा निर्णय कधी होणार, एवढेच औत्सुक्य बॅडमिंटन अभ्यासकांना होते. सिंगापूर ओपन ही ऑलिंपिक पात्रता मालिकेतील अखेरची स्पर्धा होती. खेळाडू, स्पर्धा पदाधिकारी तसेच सिंगापूरमधील आरोग्याचा विचार करून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. ही स्पर्धा नव्याने होणार नाही, असे जागतिक बॅडमिंटन महासंघाने स्पष्ट केले. जगभरातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय झाला आहे.    

अखेरची ऑलिंपिक पात्रता स्पर्धा रद्द झाली असली, तरी ऑलिंपिक पात्रता खेळाडूंबाबत महासंघ लवकरच निर्णय घेईल, असे जागतिक महासंघाने सांगत साईना आणि श्रीकांतच्या धूसर आशा कायम ठेवल्या. 

महासंघाच्या बैठकीवर आशा
अनेक ऑलिंपिक पात्रता स्पर्धा रद्द झाल्या आहेत. या परिस्थितीत जागतिक बॅडमिंटन महासंघाची लवकरच बैठक होणार आहे आणि सर्वांना समान न्याय मिळण्यासाठी नव्याने क्रमवारी तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साईना, श्रीकांतच्या आशा संपलेल्या नाहीत, असे मानले जात आहे.

ऑलिंपिकची पात्रता

  • क्रमवारीतील पहिले तिघे थेट पात्र; तिघेही एकाच देशाचे असले तरी.
  • अव्वल आठमधील प्रत्येक देशाचा एक
  • त्यानंतर प्रत्येक देशाचा एकच खेळाडू
  • पुरुष एकेरी क्रमवारीत बी साई प्रणीत तेरावा, त्यामुळे प्रवेश निश्चित
  • या क्रमवारीत किदांबी श्रीकांत २० व्या स्थानी 
  • महिला एकेरीत पी व्ही सिंधू सातवी. 
  • साईना या स्पर्धेसाठी अपात्र, अव्वल सोळात असल्यासच एका देशाच्या दोघींना प्रवेश.

​ ​

संबंधित बातम्या