सिंधूच्या प्रोत्साहनाने तई भारावली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 3 August 2021

पी. व्ही. सिंधूला ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराजित केलेली तई झू यिंग अंतिम सामन्यात पराभूत झाली होती. त्यामुळे ती निराश होती; पण पदकाचा स्वीकार केल्यानंतर सिंधूने केलेल्या प्रोत्साहनाबद्दल तई झू यिंगने जागतिक विजेतीचे आभार मानले आहेत.

मुंबई - पी. व्ही. सिंधूला ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराजित केलेली तई झू यिंग अंतिम सामन्यात पराभूत झाली होती. त्यामुळे ती निराश होती; पण पदकाचा स्वीकार केल्यानंतर सिंधूने केलेल्या प्रोत्साहनाबद्दल तई झू यिंगने जागतिक विजेतीचे आभार मानले आहेत.

तई झू यिंगने इन्स्टाग्रामवर सिंधूच्या छायाचित्रासह आपली अंतिम सामन्यानंतरची पोस्ट शेअर केली आहे. सोबत पदकासह असलेले दोघींचे छायाचित्रही शेअर केले आहे. रविवारी सिंधूने ब्राँझ पदकाची लढत जिंकली, तर तई अंतिम सामन्यात पराजित झाली. अर्थातच तिने हे मातृभाषेत लिहिले आहे.

तुम्हाला एक गोष्ट सांगायलाच हवी. अंतिम सामन्यातील माझ्या कामगिरीवर मी समाधानी होते. पदक स्वीकारल्यानंतर सिंधू माझ्याकडे धावत आली आणि तिने मला घट्ट पकडले. माझा चेहरा हातात धरून म्हणाली, तुला पराभवामुळे या ठिकाणी उभे राहणे त्रासदायक झाले असेल; पण तू निराश होण्याचे कारण नाही. तू चांगली खेळलीस. आज कदाचित तुझा दिवस नसेल. त्यानंतर तिने दोन्ही हातांनी मला धरले आणि तुझ्या भावना काय आहेत, त्या मी समजू शकते. सिंधूने मनापासून केलेले प्रोत्साहन पाहून मला अश्रू आवरले नाहीत. ती खरेच सांगत होती, कारण मी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी खूपच प्रयत्न केले होते, असे तई म्हणाली.  

ऑलिंपिक सुवर्णपदकापासून सलग तिसऱ्यांदा वंचित राहिले. अंतिम फेरीत चांगला खेळ झाला नाही. त्यामुळे खंत असणारच. अंतिम फेरीत खेळण्याचे लक्ष्य किमान साध्य केले याचे समाधान आहे, असेही तिने सांगितले. त्याचबरोबर मला सतत प्रोत्साहित केल्याबद्दल, मला साथ दिल्याबद्दल आभार, असेही म्हटले आहे.


​ ​

संबंधित बातम्या