Thailand Open : कोरोना टेस्टवेळी नाकातून आलं रक्त; श्रीकांत संतापला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

आम्ही इथं मॅच खेळायला आलोय रक्त सांडायला नाही. याठिकाणी पोहचल्यानंतर चार चाचण्या झाल्या. चाचणीच्या वेळीचा अनुभव सहन करण्यापलीकडचा होता, असे ट्विट करत श्रीकांतने आपला भयावह अनुभव फोटोसह ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलाय.

Thailand Open :  कोरोना चाचणीच्या दरम्यान भारतीय पुरुष बॅटमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतच्या नाकातून रक्त आल्याची घटना घडली आहे. त्याने यासंदर्भात ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही  याठिकाणी खेळायला आलोय. यासाठी आम्ही स्वत:ची काळजी घेत आहोत. थायलंड दौऱ्यावर आतापर्यंत चार चाचण्या झाल्या. त्यावेळीचा अनुभव खूप भयावह होता, अशी माहिती श्रीकांतने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीय. 

ट्विटमध्ये श्रीकांतने लिहिलंय की, ''आम्ही इथं मॅच खेळायला आलोय रक्त सांडायला नाही. याठिकाणी पोहचल्यानंतर चार चाचण्या झाल्या. चाचणीच्या वेळीचा अनुभव सहन करण्यापलीकडचा होता.'' या वृत्ताला जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) दुजोरा दिला असून श्रीकांतला योग्य ते  उपचार दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

Covid 19 : प्रोटोकॉलवर नाक मुरडणाऱ्या सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

भारतीय संघाची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंची चौथ्यांदा कोरोना चाचणी घेण्यात आली होती.  थायलंड ओपनसाठी पोहचलेले सर्व खेळाडू बायोबबलमध्ये आहेत. 12 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतातून थायलंडला पोहचल्यानंतर नियमानुसार सर्व खेळाडूंना क्वारंटाईनच्या प्रक्रियेतून जावे लागले होते.


​ ​

संबंधित बातम्या