आशियाई कुस्ती : बजरंग पुनियाचे सोनेरी यश
बजरंग पुनियाने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले सातत्य सिद्ध करताना आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
मुंबई : बजरंग पुनियाने जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपले सातत्य सिद्ध करताना आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारताच्या परविन राणाला रौप्य, तर सत्यव्रत काडियान आणि रवी कुमारला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. ही स्पर्धा चीनमध्ये झीआन येथे सुरू आहे.
बजरंगने 65 किलो गटात बाजी मारताना आशियाई क्रीडा ब्रॉंझ पदक विजेत्या जपानच्या सायात्बेक ओकासोव याचा 2-7 अशा पिछाडीवरून 12-7 असा पराभव केला. या यशस्वी प्रतिकारासह त्याने चीनमधील या स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्यही साधले.
दोन वर्षांपूर्वी दिल्ली स्पर्धेत बजरंगने सुवर्णपदक जिंकत धक्का दिला होता, पण गतवर्षी त्याच्यावर सर्वांच्या नजरा असताना त्याला ब्रॉंझ पदकावरच समाधान मानावे लागले होते. या वेळी मात्र त्याने कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. खरं तर त्याची सुरवात खराब होती. पहिल्या मिनिटानंतर तो 0-4 मागे होता, तर ब्रेकला 2-5 मागे पडला. ब्रेकनंतर काही वेळातच त्याला खाली पाडण्यात आले. त्यामुळे पिछाडी 2-7 झाली.
आशियाई कुस्ती : बजरंग पुनियाने सायतबेक ओकासोवविरुद्ध विजय मिळवत सुवर्ण पदक पटकाविले#AsianWrestling #BajrangPunia @BajrangPunia
— SakalSports (@SakalSports) April 23, 2019
बजरंगने प्रतिकार सुरू केला खरा, पण त्याला वेळ अपुरा पडणार अशी भीती वाटत होती. एक मिनिट असेपर्यंत तो 4-7 मागेच होता. बजरंगने अचानक वेगवान कुस्ती खेळताना आपल्या ताकदवान आक्रमणाने ओकासोव याला जेरीस आणले. बजरंगने या वेळी नव्या क्लृप्त्या वापरण्यास सुरवात केली. त्याने पंचांना आपल्याला अनुकूल अशी बैठी स्थिती देण्यास भाग पाडले आणि या प्रकारच्या तीन झटापटीत गुण घेत लढत संपेपर्यंत आपली आघाडी पाच गुणांपर्यंत नेली होती.
दरम्यान, 57 किलो गटातील ब्रॉंझ पदकाच्या लढतीत रवी कुमार माजी जागतिक विजेता युकी ताकाहाशी याच्याविरुद्ध 3-5 असा पराजित झाला.