World Cup 2019 : बांगलादेशचा कर्णधार आयसीसीवर चांगलाच भडकला

वृत्तसंस्था
Wednesday, 12 June 2019

विश्व करंडक स्पर्धेतील बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणारा कालचा (ता. 11) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफी मुर्तझाने नाराजी व्यक्त केली आहे.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्व करंडक स्पर्धेतील बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणारा कालचा (ता. 11) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफी मुर्तझाने नाराजी व्यक्त केली आहे.

मैदानावर येऊन खेळायला न मिळणं हे सर्व संघांसाठी खूप निराशाजनक असते. एका आठवड्यात तीन सामने रद्द झाल्यामुळे ही कसली स्पर्धा आहे, हेच समजत नाही. आम्हाला न्यूझीलंडविरुद्ध विजयाची संधी होती, पण आमचा पराभव झाला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धही आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. आज चांगला खेळ करून आम्ही जिंकू अशी आशा होती, पण पावसाने सर्वांचीच निराशा केली. अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनची तब्येत बिघडली आहे. मात्र, तो चार-पाच दिवसांत ठीक होईल, अशी माहिती मुर्तझाने दिली आहे.

ब्रिस्टल येथील काउंटी क्रिकेट मैदानावर हा सामना होणार होता. मात्र, निर्धारित वेळेनंतर चार तास होऊन गेल्यानंतरही पाऊस थांबला नाही, त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेत पंचांनी दोन्ही संघांना एक एक गुण दिला.

यंदा विश्व करंडक स्पर्धेत बांगलादेशने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. त्यांना दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असून एका सामन्यात विजय मिळविला आहे. दुसरीकडे श्रीलंकेने तीन सामने खेळले असून त्यांना एक विजय आणि एक पराभव स्वीकारावा लागला असून त्यांचा एक सामना पावसाने वाया गेला होता.

भारत-न्यूझीलंड सामनाही रद्द होण्याची शक्यता?

यंदाच्या विश्व करंकड स्पर्धेतील तीन सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. उद्या (ता.13) नॉटिंगहॅम येथे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची माहिती स्थानिक हवामान विभागाने दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नॉटिंगहॅम येथे पाऊस पडत असल्यामुळे दोन्ही संघ सरावासाठी मैदानावर पोहचू शकले नाहीत. पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे उद्या होणारा सामनाही रद्द करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


​ ​

संबंधित बातम्या