World Cup 2019 : बांगलादेशच्या कामगिरीकडे लक्ष; आज ऑस्ट्रेलियाशी लढत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 June 2019

यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडीजकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा होती. मात्र, त्यांची जागा बांगलादेश संघाने घेतली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीने पाचव्या क्रमांकापर्यंत झेप घेणाऱ्या बांगलादेश संघाची उद्या ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे.

वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडीजकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा होती. मात्र, त्यांची जागा बांगलादेश संघाने घेतली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीने पाचव्या क्रमांकापर्यंत झेप घेणाऱ्या बांगलादेश संघाची उद्या ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. आणखी एका धक्कादायक निकालासाठी बांगलादेश संघ उत्सुक असला, तरी त्यांना प्रतिस्पर्धी पाचवेळचा विजेता आहे हे विसरून चालणार नाही. 

भारताविरुद्ध झालेला पराभव वगळता ऑस्ट्रेलियाची स्पर्धेतील वाटचाल जबरदस्त आहे. यानंतरही त्यांचे साहाय्यक प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन अजूनही आमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी झाली नाही असे समजत असतील, तर उद्या त्यांना ती करून दाखविण्याची संधी असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाला ऍरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर यांच्याकडून सातत्याने धडाकेबाज सुरवात मिळत आहे. पण, या भक्कम पायावर धावांचा डोंगर उभा करण्यात त्यांना फारसे यश आलेले नाही. त्यांची मजल तीनशे, साडेतीनशेपर्यंत दिसत असली, तरी सुरवात लक्षात घेता ती मोठी वाटली नाही.

सलामीनंतर स्टिव्ह स्मिथचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मधल्या फळीत मोठी खेळी उभारता आलेली नाही. गोलंदाजीतदेखील सुरवातीनंतर मधल्या टप्प्यात त्यांचा जोश कमी होताना दिसून येतो. मग, शेवटी पुन्हा मिशेल स्टार्कला त्यांच्या मदतीला धावून यावे लागते असेच चित्र आतापर्यंतचे आहे. त्यामुळे फॉर्मात असणाऱ्या खेळाडूंना अन्य खेळाडूंची साथ मिळायल हवी, तरच ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत आपली निर्विवाद हुकुमत दाखवू शकेल. 

दुसरीकडे बांगलादेश संघाची कामगिरी धक्कादायक जेवढी आहे, तेवढीच ती प्रतिस्पर्ध्यांमध्ये धडकी भरविणारीदेखील आहे. वेस्ट इंडीजच्या सामन्यापर्यंत त्यांचा फलंदाज शकिब अल हसन खेळत होता. मात्र, आता विंडीजविरुद्धच्या विजयाने त्यांचा नुसता आत्मविश्‍वासच उंचावलेला नाही, तर तमिम इक्‍बाल, सौम्या सरकार या फलंदाजांची गाडी रुळावर येऊ लागली आहे. लिटन दास यानेही आपली बॅट विंडीजविरुद्ध परजून घेतली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शकिब अल हसनच्या सातत्याला रोखण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पार करावे लागेल. दोन अर्धशतक आणि दोन शतके असे कमालीचे सातत्य त्याने या स्पर्धेत राखले आहे. 

आणखी एक सनसनाटी विजय मिळवून बांगलादेश उर्वरित सामन्यांसाठी प्रतिस्पर्ध्यांमधील धडकन वाढविण्यासाठी कितीही उत्सुक असला, तरी पाचवेळच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्यांना पुन्हा एकदा एकत्रित सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल. 

हवामान पावसाळी असून, अधूनमधून पावासाची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे सुरवात गोलंदाजांसाठी चांगली राहील. साहजिकच नाणेफेक जिंकणारा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यास पसंती देईल.


​ ​

संबंधित बातम्या