World Cup 2019 : साऊदम्टनमध्ये बांगलादेशच्या भारतापेक्षा जास्त धावा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 June 2019

रोस बाऊलच्या ज्या मैदानावर भारतीय फलंदाजीची सव्वादोनशे धावा करताना दमछाक झाली त्याच मैदानावर बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध 7 बाद 262 धावांपर्यंत मजल मारली. शकिब हसन आणि मुशफिकर यांनी भारतीय फलंदाजांनी केलेल्या चुका टाळल्या आणि सावध अर्धशतके केली

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्टन : रोस बाऊलच्या ज्या मैदानावर भारतीय फलंदाजीची सव्वादोनशे धावा करताना दमछाक झाली त्याच मैदानावर बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध 7 बाद 262 धावांपर्यंत मजल मारली. शकिब हसन आणि मुशफिकर यांनी भारतीय फलंदाजांनी केलेल्या चुका टाळल्या आणि सावध अर्धशतके केली. 

शनिवारी याच मैदानावर ढगाळ वातावरण आणि संथ खेळपट्टी याचा फायदा घेत अफगाणच्या गोलंदाजांनी भारताच्या भरभक्कम फलंदाजीला वेसण घातले आजही प्रथम गोलंदाजी करण्याची मिळालेली संधीचा फायदा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय डावापासून बोध घेतला त्यामुळे त्यांना अडीचशेच्या पलिकडे मजल मारता आली. 

अफगाणिस्तानने पुन्हा एकदा फिरकी आक्रमणावर भर दिला तर बांगलादेशने सलामीत डावा उजवा फलंदाज यासाठी बदल करताना सौम्या सरकारऐवजी लिटॉन दास याला सलामीला पाठवले पण अफगाणचे अस्त्र मुजीबने त्याला बाद केले. त्यानंतर महम्मद नबीने तमिम इक्‍बालला माघारी धाडल्यावर बांगलादेशवर दडपण येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली, पण भारतीय फलंदाजीपासून बोध घेतल्याचे शकिब अल हसन आणि मुशफिकर यांच्या फलंदाजीतून दिसून आले. या दोघांनी डाव सावरताना धावांची गती कमी होणार नाही याची काळजी घेतली. शकिबला एकच चौकार मारता आला तरी त्याचा स्ट्राईक रेट 73 चा होता. 

अर्धशतकानंतर शकिब मुजीबच्या चेंडूवर पायचीत झाला त्यानंतर मुशफिकरने एक बाजू सांभाळली. 35 षटकानंतर बांगलादेशने गिअर बदलण्यास सुरुवात केली. महम्मदुल्ला आणि मोसादेक हुसैन यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुशफिकरनेही आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली तो बाद झाला तेव्हा बांगलादेशने अडीचशे धावा केल्या होत्या. 

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : 50 षटकांत 7 बाद 262 (तमिम इक्‍बाल 36, शकिब अल हसन 51 -69 चेंडू, 1 चौकार, मुशफिकर रहिम 83 -87 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, मोहम्मदुल्ला 27 -38 चेंडू, 1 चौकार, मोसादेक हुसैन 35 -24 चेंडू, 4 चौकार, मुजीब उर रहमान 10-0-39-3, गुलबदीन नबी 10-1-56-2) 


​ ​

संबंधित बातम्या