मेस्सीला सूर गवसेना; बार्सिलोनाची हार

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

-लिओनेल मेस्सी; तसेच नवोदित स्टार आंसू फाती मैदानात असूनही बार्सिलोनास ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग फुटबॉलमध्ये ग्रॅनाडाविरुद्ध 0-2 हार पत्करावी लागली.

-ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पेनल्टीवरील गोल हे युव्हेंटिसच्या वेरोनाविरुद्धच्या 2-1 विजयाचे वैशिष्ट्य. त्याचा मोसमातील हा दुसरा गोल आहे.

-मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीगमध्ये वॅटफोर्डचा 8-0 असा धुव्वा उडवला. सिटीने वीस मिनिटांतच 5-0 अशी आघाडी घेतली होती.

माद्रिद - लिओनेल मेस्सी; तसेच नवोदित स्टार आंसू फाती मैदानात असूनही बार्सिलोनास ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग फुटबॉलमध्ये ग्रॅनाडाविरुद्ध 0-2 हार पत्करावी लागली. बार्सिलोनास हरवलेल्या ग्रॅनाडाने लीगमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. 
मेस्सी अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही; त्यामुळे तो; तसेच नवोदित फातीला सुरवातीस राखीव करण्यात आले होते; पण दोघेही उत्तरार्धात मैदानात उतरले. मात्र बार्सिलोनास पूर्वार्धाप्रमाणेच उत्तरार्धातही गोल स्वीकारावा लागला. बार्सिलोनाने यंदा पाचपैकी दोनच लढती जिंकल्या आहेत. अवे मैदानावर तर एकही जिंकलेली नाही. 
गतमोसमात बार्सिलोनाने तीन लढती गमावल्या होत्या; तर या वेळी यापूर्वीच दोन लढती गमावल्या आहेत. त्यांचे अवघे सात गुण आहेत. ही त्यांची 1994 पासूनची सर्वात खराब सुरवात आहे. ही कामगिरी नक्कीच चिंतेची बाब आहे. दोन-तीन लढतींत अपेक्षित निकाल मिळत नाही, त्या वेळी नक्कीच खेळ चांगला होत नसतो, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक एरनेस्टो वालवेर्दे यांनी सांगितले. 
मेस्सीचा सामन्यात प्रभाव पडलाच नाही. त्याला गोलच्या संधी साधत्या आल्या नाहीत. बार्सिलोना आता गुणतक्‍त्यात सहावे आहेत. ऍटलेटिको माद्रिदला घरच्या मैदानावर सेल्टा विगोविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली. ऍटलेटिकोने यामुळे अव्वल स्थान गमावले आहे. 

रोनाल्डोचा पेनल्टीवर गोल 
रोम ः ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पेनल्टीवरील गोल हे युव्हेंटिसच्या वेरोनाविरुद्धच्या 2-1 विजयाचे वैशिष्ट्य. त्याचा मोसमातील हा दुसरा गोल आहे. युव्हेंटिसने पिछाडीवरून ही लढत जिंकली. त्यानंतर ते इटालियन लीगमध्ये अव्वल नाहीत. दरम्यान, इंटर मिलानने एसी मिलानला 2-0 असे हरवून सिरी ए मध्ये अव्वल क्रमांक मिळवला. 

मॅंचेस्टर सिटीचा 8 गोलचा धडाका 
लंडन ः मॅंचेस्टर सिटीने प्रीमियर लीगमध्ये वॅटफोर्डचा 8-0 असा धुव्वा उडवला. सिटीने वीस मिनिटांतच 5-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या वीस मिनिटांत पाच गोल करणारा सिटी हा प्रीमियर लीगमधील पहिला संघ ठरला. त्यांच्या सहा जणांनी गोल केले. त्यात बर्नार्ड सिल्वाची हॅटट्रिक लक्षणीय होती. लीगच्या तळाशी असलेल्या वॅटफोर्डचे अवघे दोन गुण आहेत. त्याचा गोलफरक उणे 18 आहे. 
लीस्टरने पिछाडीनंतर टॉटनहॅमला 2-1 असे हरवले. या सामन्यात दोन गोल व्हिडिओ रेफरींनी नाकारले. एव्हर्टन शेफील्ड युनायटेडविरुद्ध पराभूत झाले. सामन्यातील निर्णायक गोल 11 मिनिटे असताना झाला. ख्रिस वूडच्या दोन गोलमुळे बर्नलीने नॉर्विचचा पाडाव केला. 
 


​ ​

संबंधित बातम्या