बायर्न म्युनिच अजिंक्‍य ; चॅम्पियन्स लीग स्पर्धेत सर्व अकरा सामन्यांत विजय मिळवण्याचा पराक्रम 

टीम ई-सकाळ
Tuesday, 25 August 2020

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकताना सर्व लढती जिंकत बायर्न म्युनिचने खऱ्या अर्थाने स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावले. बायर्नने निर्णायक लढतीत पीएसजीला 1-0 असे हरवले.

लिस्बन : चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद जिंकताना सर्व लढती जिंकत बायर्न म्युनिचने खऱ्या अर्थाने स्पर्धेचे अजिंक्‍यपद पटकावले. बायर्नने निर्णायक लढतीत पीएसजीला 1-0 असे हरवले. या सामन्यातील बायर्नचा विजयी गोल केलेला किंग्जली कोएमन हा पीएसजीच्या अकादमीत तयार झालेला फ्रान्सचा खेळाडू आहे. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

कोएमन याने 59 व्या मिनिटास चेंडूला अचूक दिशा दाखवताना जणू माजी सहकाऱ्यांना चकवले. बायर्न विजेतेपद साजरे करीत असताना 80 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये एकही चाहता नव्हता, पण बायर्नचा उत्साह कमी झाला नाही. सामना संपल्यावर दोन तासांनी स्टेडियमवरील प्रकाशझोत बंद करण्यात आले, पण बायर्न संघातील तिघांना मैदान सोडवत नव्हते. 

बायर्नने हॅन्सी फ्लिक यांच्या मार्गदर्शनाच्या पहिल्याच मोसमात बंडेस्लीगा, जर्मन कप याच्यापाठोपाठ चॅम्पियन्स लीग जिंकली. बायर्न एनत्राश्‍त फ्रॅंकफर्टविरुद्ध 1-5 पराजित झाल्यानंतर बायर्नने निको कोवाक यांच्याऐवजी फ्लिक यांच्याकडे जबाबदारी सोपवली. त्यावेळी बायर्न बंडेस्लीगात चौथे होते. कमालीची पीछेहाट झाल्यावर आम्ही प्रगती केली आहे. अंतिम सामन्यातील यशाचे श्रेय गोलरक्षक मॅन्यूएल नेऊर यालाच आहे, असे बायर्नचा अव्वल मध्यरक्षक थॉमस म्युएल्लर यांनी सांगितले. 

लुकाकूच्या आत्मघाती गोलमुळे युरोपा लीगमध्ये सेविलाची खिताबावर मोहर   

पीएसजीची मदार नेमार आणि किलिन एम्बापे यांच्यावर होती. पण त्यांना बायर्न बचावावर दडपण आणण्यात अपयश आले. संधी निर्माण केल्या, तेव्हा त्यात अचूकतेचा अभाव होता. त्याहीपेक्षा नेऊरची कामगिरी दोघांवरील दडपण वाढवत होती. त्याचवेळी फ्लिक यांनी क्रोएशियाच्या इवान पेरिसीक याच्याऐवजी डाव्या बगलेत कोएमनला खेळवण्याची केलेली चाल यशस्वी ठरली. त्याने जोशुआ किमिश याच्या पासवर केलेला हेडर निर्णायक ठरला. या गोलनंतर बायर्नचा बचाव जास्तच भक्कम होत गेला आणि पीएसजीच्या आशा दुरावत गेल्या. 

बायर्नचा दबदबा 
- बायर्न म्युनिच सहाव्यांदा विजेते, सर्वाधिक विजेतेपदाच्या क्रमवारीत लिव्हरपूलसह संयुक्त तिसरे, रेयाल माद्रिद (13) अव्वल 
- सर्व सामने जिंकत चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा पराक्रम केलेला बार्सिलोना हा पहिला संघ. सलग 11 सामन्यात विजय 
- तिहेरी विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केलेला बायर्न हा दुसरा संघ. यापूर्वी बार्सिलोना 
- बायर्नचा 2020 मध्ये 26 पैकी 25 सामन्यात विजय. मोसमात सलग 23 सामन्यांत विजय 
- बायर्नचे चॅम्पियन्स लीगच्या या मोसमात 11 सामन्यांत 43 गोल, तर सर्वाधिक गोलचा विक्रम केलेल्या बार्सिलोनाचे 1999-2000 मध्ये 16 सामन्यांत 45 गोल 
- बायर्नचे चॅम्पियन्स लीगमध्ये आता एकंदर 500 गोल. या क्रमवारीत रेयाल माद्रिद (567) आणि बार्सिलोनापाठोपाठ (517) तिसरे 
- बायर्नचा गोलरक्षक नेऊरविरुद्ध विश्‍वकरंडक तसेच चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात एकही गोल नाही 
- कोएमन याचे हे विसावे विजेतेपद, तो अवघा 24 वर्षांचा 
- पीएसजी 35 वर्षानंतर अंतिम सामन्यात गोल करण्यात अपयशी


​ ​

संबंधित बातम्या