ब्रिटन, बेल्जियम दौऱ्यातून हॉकी संघाची पूर्वतयारी

वृत्तसंस्था
Monday, 23 September 2019

-ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी आपण नेमके किती तयार आहोत, हे भारतीय हॉकी संघांना ब्रिटन तसेच बेल्जियम दौऱ्यातून जाणून घेता येईल

पुरुष संघ बेल्जियममध्ये तर महिला संघ ब्रिटनमध्ये पाच लढती खेळणार आहे. 

-महिला हॉकी संघ ब्रिटनविरुद्ध 27 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरदरम्यान पाच कसोटींची मालिका खेळणार आहे,

-पुरुष संघ बेल्जियममध्ये 26 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान पाच लढती खेळणार आहे.

मुंबई - ऑलिंपिक पात्रता लढतीसाठी आपण नेमके किती तयार आहोत, हे भारतीय हॉकी संघांना ब्रिटन तसेच बेल्जियम दौऱ्यातून जाणून घेता येईल. पुरुष संघ बेल्जियममध्ये तर महिला संघ ब्रिटनमध्ये पाच लढती खेळणार आहे. 
महिला हॉकी संघ ब्रिटनविरुद्ध 27 सप्टेंबर ते 4 ऑक्‍टोबरदरम्यान पाच कसोटींची मालिका खेळणार आहे, तर पुरुष संघ बेल्जियममध्ये 26 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान पाच लढती खेळणार आहे. त्यातील तीन बेल्जियमविरुद्ध तर दोन स्पेनविरुद्ध आहेत. ""ऑलिंपिक पात्रता लढतीच्या दृष्टीने बेल्जियम दौरा महत्त्वाचा आहे. अनुभवी खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. जगज्जेत्या तसेच युरो विजेत्या बेल्जियम तसेच स्पेनविरुद्धच्या लढती आमची खरी चाचणी असेल. या दोन्ही लढतीत आम्ही काही प्रयोग करणार आहोत,'' असे भारतीय कर्णधार मनप्रीत सिंगने सांगितले. 
आपला संघ स्थिरावलेला असल्याने ब्रिटनविरुद्धच्या मालिकेत काही वेगळ्या चालींची चाचणी होऊ शकेल, असा विश्‍वास महिला संघाची कर्णधार राणी रामपाल हिला आहे. "आमच्या संघात गेल्या काही महिन्यांत फारसे बदल झालेले नाहीत. तीन आठवड्यांच्या बंगळूर शिबिरात खेळातील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले होते. त्यांचा उपयोग या मालिकेत करणार आहोत. ही मालिका महत्त्वाची आहे. आमच्या ऑलिंपिक पात्रता लढती अमेरिकेविरुद्ध आहेत. ब्रिटन तसेच अमेरिकेची खेळाची शैली जवळपास सारखी आहे. त्या दृष्टीनेही ही मालिका महत्त्वाची आहे,' असे राणीने सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या