मुलींनो बाहेर पडा, आवडीचा खेळ खेळा, तरच स्वप्नांचा पाठलाग करू शकाल ः नाहिदा नबी

वृत्तसंस्था
Friday, 4 October 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "बेटी बचाओ, बेटी पढाओ' या घोषणेत तिने "बेटी को पहिलवान बनाओ' अशी भर घातली आहे

- मित्राचा सल्ला ऐकून तीने कुस्तीच्या आखाड्यात उडी घेतली आणि आखाड्याचीच होऊन गेली.

कतरा (जम्मू-काश्‍मिर) ः काश्‍मिर खोऱ्यातील पहिली महिला कुस्तीगीर नाहिदा नबी हिने आपल्या अनुभवावरून काश्‍मिर खोऱ्यातील कुटुंबियांना साद घालत तुमच्या मुलींना कुस्तीगीर बनवा किंवा अन्य कुठलाही खेळ खेळूद्यात, तरच त्या आपल्या स्वप्नांचा पाठलाग करू शकतील असे आवाहन केले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "बेटी बचाओ, बेटी पढाओ' या घोषणेत तिने "बेटी को पहिलवान बनाओ' अशी भर घातली आहे. आपली भूमिका मांडताना नहिदा म्हणते,""काश्‍मिरमधील मुलींनी घराबाहेर पडून तुम्हाला हवा तो खेळ खेळावा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलग करणे सोपे जाईल आणि तुमचा अभिमानही वाटेल.'' 
अजूनही येथील जनता परंपरेत अडकली आहे. त्यामुळेच माझी कुस्तीगीर बनण्याची इच्छा असूनही मला कुणी शिकविण्यासाठी पुढे आले नाही. मला देशाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव मोठे करायचे आहे, असे ती म्हणते. 
नाहिदाला कुस्ती प्रशिक्षक नसला, तरी निशा शर्मा आणि आशिक कुमार यांनी तिला नुसतीच दिशा दिली नाही, तर तिच्या पाठिमाघे भक्कमपणे उभे राहिले. गेली चार वर्षे नाहिदा कुस्ती खेळत आहे. गेल्यावर्षी उत्तर प्रदेश येथील गोंडा येथे झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ती सर्वप्रथम खेळली. अर्थात, तिला फारसे यश मिळाले नाही. पदकापासून ती वंचित राहिली. पण, तिने कुस्ती खेळणे सोडले नाही. 
महाविद्यालयीन कालावधीत ती उत्तम कबड्डी खेळायची. विद्यापीठाचे शिक्षण सुरू झाले तेव्हा तिच्या प्रशिक्षक मित्राने तिला कुस्ती खेळण्याचा सल्ला दिला. मित्राचा सल्ला ऐकून तीने कुस्तीच्या आखाड्यात उडी घेतली आणि आखाड्याचीच होऊन गेली. आता अधिक चांगले प्रशिक्षण घेऊन तिला काश्‍मिर खोऱ्यातील मुलींना कुस्तीगीर बनवायचे आहे. माझे प्रशिक्षकाशिवाय अडले, पण कुस्तीत कारकिर्द घडवू पाहणाऱ्या उद्याच्या खेळाडूंबाबत तसे घडू द्यायचे नाही, असे तिला वाटते. 
 


​ ​

संबंधित बातम्या