कर्णधारपदावरून हटविल्याचे दुःख नाही, पण आरोप खोटे ः भूपती

वृत्तसंस्था
Wednesday, 6 November 2019

-  डेव्हिस करंडक लढतीसाठी मला कर्णधारपदावरून हटविले याचे मला दुःख नाही, पण देशासाठी खेळण्यास तयार नसल्याचा भारतीय टेनिस संघटनेने केलेल्या आरोपात तथ्य नाही

- मला कर्णधारपदावरून हटवले आहे या संदर्भात अजून "एआयटीए'कडून काहीच सांगण्यात आलेले नाही

- पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी सुरवातीला मला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले. संघ निवडीच्या पद्धतीतही माझा समावेश करण्यात आला होता 

नवी दिल्ली - डेव्हिस करंडक लढतीसाठी मला कर्णधारपदावरून हटविले याचे मला दुःख नाही, पण देशासाठी खेळण्यास तयार नसल्याचा भारतीय टेनिस संघटनेने केलेल्या आरोपात तथ्य नाही, असे सडेतोड उत्तर भारताचा अनुभवी टेनिसपटू महेश भूपती याने बुधवारी दिले आहे. 
भारतीय टेनिसच्या इतिहासात भूपती हा सर्वात यशस्वी टेनिसपटू असून, भारतासाठी खेळताना त्याने कधीही आपली अनुपलब्धता दाखवली नव्हती. पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानात खेळण्याचा विषय आल्यावर फक्त त्याने खेळण्यास नकार दिला होता. आता ही लढत "आयटीएफ'नेच पाकिस्तानातून हलविण्याचा निर्णय घेतला आहे. 
भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) लढत पाकिस्तानात होईल हे गृहित धरून माजी खेळाडू रोहित राजपाल याची कर्णधारपदी नियुक्ती केली होती. मात्र, लढत पाकिस्तानातून हलविण्यात आल्यानंतरही त्यांनी त्यांची निवड कायम ठेवली आहे. 
या विषयी बोलताना भूपती म्हणाला, ""मला हटविल्याचे दुःख नाही. नवा कर्णधार नियुक्त करण्याची वेळ आली होती असे म्हणणे समजू शकतो. पण, भूपतीने देशासाठी खेळण्याची वेळ आली असताना अनुपलब्धता व्यक्त केली हा "एआयटीए'चा आरोप चुकीचा आहे. पाकिस्तानात खेळणे खरेच सुरक्षित नव्हते असे वाटत होते. त्यामुळेच आपण तसा निर्णय घेतला आणि याच कारणावरून "आयटीएफ'नेही या लढतीचे केंद्र बदलले आहे. माझ्यासह नकार देणाऱ्या अन्य खेळाडूंना टेनिस संघटना दंड करणार असल्याची चर्चा आहे आणि ती योग्य नाही.'' 
मला निरोपच नाही 
या लढतीसाठी मला कर्णधारपदावरून हटवले आहे या संदर्भात अजून "एआयटीए'कडून काहीच सांगण्यात आलेले नाही. भूपती म्हणाला,""मला हटवले असल्याचे "एआयटीए'ने कळवायला हवे होते. त्यांच्याकडून अजून मला या संदर्भात कुठलाही निरोप आलेला नाही. रोहित पाकिस्तानात जाण्यास तयार होता याबाबत मला आक्षेप नाही. पण, ही निवड "आयटीएफ'च्या निर्णयापूर्वीची होती. आता ही लढत पाकिस्तानात होणार नाही म्हटल्यावर मी देशासाटी अनुपलब्ध असण्याचा प्रश्‍नच येत नाही. देशासाठी खेळण्यास मी कधीच नकार दिलेला नाही. त्यामुळे जोवर "एआयटीए'कडून निरोप येत नाही, तोवर मीच कर्णधार आहे.'' 
"एआयटीए'चे सचिव हिरोन्मय चॅटर्जी यांनी भूपतीला या संदर्भात कळविले असल्याचे सांगितले. ते म्हणाले,""मी 4 नोव्हेंबर रोजी व्यक्तिशः फोन करून भूपतीला हा बदल कळविला होता. आम्ही नवा कर्णधार नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे त्या वेळी त्याला सांगितले होते.'' 
भूपतीने मात्र त्या वेळी आपल्याला हा निर्णय केवळ पाकिस्तानात होणाऱ्या लढतीसाठी घेत आहोत असे सांगण्यात आल्याचे सांगितले. तो म्हणाला,""खेळाडूंना मी नको असेन, तर ठीक आहे. पण, मला देशहिताचे काही पडललेले नाही असे बोलणे गैर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी सुरवातीला मला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले. संघ निवडीच्या पद्धतीतही माझा समावेश करण्यात आला होता आणि आता अचानक माझी हकालपट्टी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.'' 
-------------- 
भूपती म्हणतो... 
-इटलीविरुद्ध हरल्यावर मला काढणे मी समजू शकतो 
-भूपतीला संघाला जागतिक गटात नेऊ शकला नाही हे म्हणणेही योग्य 
-लढतीच्या केंद्राविषयी "आयटीएफ'चा निर्णय होण्यापूर्वी ते मला कसे काय बदलू शकतात 
-इटलीविरुद्धच्या लढतीनंतरच माझी मुदत संपत होती, तर पाकविरुद्धच्या नियोजनासाठी मला का बोलाविण्यात आले 
-कर्णधारपदासाठी मी योग्य नाही असे म्हटले तरी चालेल. पण, देशासाठी मी खेळलो नाही असे म्हणणे चुकीचे आहे 
-पाकिस्तानात खेळण्यासाठी कुणीच खेळाडू तयार नव्हते इतकेच मी म्हणालो 


​ ​

संबंधित बातम्या