मेस्सीचे पुनरागमन; तरीही बार्सिलोनाची बरोबरी

वृत्तसंस्था
Wednesday, 18 September 2019

- मेस्सीच्या पुनरागमनाच्या लढतीत बार्सिलाेनाची चॅंपियन्स लीगमध्ये बोरुसिया डॉर्टमुंडशी बराेबरी

-नापाेलीचा  लिव्हरपूलवर विजय

-प्रथमच गतविजेत्यांची सलामीच्या लढतीत हार

-19 वर्षीय हालॅंडची हॅटट्रिक

लंडन, ता. 18 ः लिओनेल मेस्सीच्या पुनरागमनानंतरही बार्सिलोनाला चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बोरुसिया डॉर्टमंडविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करावी लागली. दरम्यान, गतविजेते लिव्हरपूल, तसेच विजेतेपदाचे आपल्याला दावेदार समजत असलेले चेल्सी यांना सुरवातीस हार पत्करावी लागली.
मेस्सी मोसमातील पहिल्या लढतीसाठी अर्धा तास मैदानावर होता; पण त्याला फार काही करता आले नाही. त्याच्या उपस्थितीनंतरही डॉर्टमंडचेच जास्त वर्चस्व होते. डॉर्टमंडची पेनल्टी किक रोखल्यानेच बार्सिलोनास हार टाळता आली. अर्थात, मेस्सी पूर्ण जोषात असता तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते.
भक्कम गोलरक्षण, तसेच संधीचा पुरेपूर फायदा घेत नापोलीने लिव्हरपूलला 2-0 असे हरवले. गतवर्षीही अखेरच्या साखळी लढतीत नापोलीने लिव्हरपूलला हरवले होते; पण त्या वेळी लिव्हरपूल पूर्ण ताकदीनिशी नव्हते. पण या वेळी नापोलीच्या भक्कम बचावामुळे लिव्हरपूलला गोलचे चारच प्रयत्न करता आले. लढत बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच नापोलीने अखेरच्या आठ मिनिटांत दोन गोल केले. अर्थातच त्यामुळे गतविजेत्यांनी सलामीची लढत गमाविण्याचा प्रसंग 1994 नंतर प्रथमच घडला.
दरम्यान, कमालीची चर्चा करून खरेदी केलेल्या ख्रिस्तियन पुल्सीक याला चेल्सीने राखीव खेळाडूच ठेवले आणि त्यांना व्हॅलेन्सियाविरुद्ध 0-1 हार पत्करावी लागली. गतमोसमात उपांत्य फेरीत धडक मारलेल्या ऍजॅक्‍सने विजयी सुरवात करताना लिल्लीला 3-0 हरवले.

19 वर्षीय हालॅंडची हॅटट्रिक
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 21 गोल झाले. त्यातील आठ एकाच सामन्यात झाले आणि त्यातील तीन नवोदित एरलिंग ब्राऊत हालॅंड याने केले. चॅंपियन्स लीग पदार्पणातच ही कामगिरी त्याने केली. त्याच्या लेड बुल साल्झबर्गने बेल्जियम विजेत्या गेंकचा 6-2 असा पराभव केला. हालॅंडने यापूर्वी या मोसमात तीन हॅटट्रिक केल्या आहेत. रेड बुल साल्झबर्गचे मार्गदर्शक जेसी मार्श हे अमेरिकेचे आहेत. चॅंपियन्स लीगमधील संघाचे ते पहिले अमेरिकन मार्गदर्शक, तसेच पहिली लढत जिंकलेलेही.


​ ​

संबंधित बातम्या