भारतीय महिलांचा दक्षिण आफ्रिकेला व्हाइटवॉश

वृत्तसंस्था
Monday, 14 October 2019

- भारतीय गोलंदाजांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर महिला संघाने सोमवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सहा धावांनी पराभव केला

- भारतीय महिलांनी मालिकेत 3-0 असा विजय मिळवून दक्षिण आफ्रिका संघाला "व्हाइटवॉश' दिला. 

- एकता बिश्‍त, दीप्ती शर्मा आणि राजेश्‍वरी गायकवाड या भारतीय गोलंदाजांची कामगिरी निर्णायक

बडोदा - भारतीय गोलंदाजांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर महिला संघाने सोमवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सहा धावांनी पराभव केला. या सामन्याने भारतीय महिलांनी मालिकेत 3-0 असा विजय मिळवून दक्षिण आफ्रिका संघाला "व्हाइटवॉश' दिला. 
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरली. एकता बिश्‍त, दीप्ती शर्मा आणि राजेश्‍वरी गायकवाड यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव 140 धावांत संपुष्टात आणला. त्यापूर्वी भारतालादेखील प्रथम फलंदाजी करताना 146 धावांचीच मजल मारता आली होती. 
विजयासाठी 147 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने ठराविक अंतराने आपल्या विकेट्‌स गमावल्या. कमी धावसंख्येचा बचाव करताना भारतीय महिला गोलंदाजांनी पाहुण्या संघाच्या फलंदाजांना कधीच स्वातंत्र्य मिळू दिले नाही. मारिझाने कॅप (29), कर्णधार सुन लुस (24) आणि लॉरा वोल्व्हार्डट (23) या तिघींखेरीज अन्य एकही फलंदाज आपले योगदान देऊ शकली नाही. 
एकता बिश्‍त सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिने 32 धावांत 3 गडी बाद केले. दीप्ती आणि राजेश्‍वरी या दोघींनी प्रत्येकी तीन गडी बाद करून तिला सुरेख साथ केली. 
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर भारतीय डावाची सुरुवातही चिंताजनक झाली. पहिल्या दोन षटकांतच त्यांनी सलामीच्या दोन्ही फलंदाजांना गमावले होते. कर्णधार मिताली राज आणि पूनम राऊत यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न केला. मात्र, त्या दोघीही पाठोपाठ बाद झाल्या. अशा कठीण परिस्थितीत हरमनप्रीत कौर हिने 76 चेंडूंत 38 आणि शिखा पांडे हिने 35 धावांचे बहुमूल्य योगदान दिल्यामुळे भारताला किमान दीडशेपर्यंत मजल मारणे शक्‍य झाले. 
भारतीय महिलांनी पहिले दोन सामने अनुक्रमे आठ आणि सहा गडी राखून जिंकले होते. 
संक्षिप्त धावफलक ः 
भारत सर्वबाद 146 (हरमनप्रीत कौर 38, शिखा पांडे 35, मारिझने कॅप 3-20) वि.वि. दक्षिण आफ्रिका सर्वबाद 140 (मारिझने कॅप 29, सुन लुस 24, एकता बिश्‍त 3-32). 


​ ​

संबंधित बातम्या