पुणे तिथे काय उणे; टेरेसवर भरविली 'बॉक्‍स क्रिकेट लीग'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 June 2019

विश्‍व करंडक सुरू झाल्यानंतर तरुणांमध्ये क्रिकेट 'फिव्हर' येतो. मग कधी गल्ली, तर कधी मैदानात क्रिकेट खेळण्याची हौस भागविली जाते, पण पुण्यातील तीन तरुणांनी बॉक्‍स क्रिकेट प्रकारात 'क्रिकेट लीग' आयोजित केली होती.

पुणे : विश्‍व करंडक सुरू झाल्यानंतर तरुणांमध्ये क्रिकेट 'फिव्हर' येतो. मग कधी गल्ली, तर कधी मैदानात क्रिकेट खेळण्याची हौस भागविली जाते, पण पुण्यातील तीन तरुणांनी बॉक्‍स क्रिकेट प्रकारात 'क्रिकेट लीग' आयोजित केली होती. दोन दिवस चाललेल्या या सामान्यांतून विजेता संघही निवडण्यात आला. 

मैदानावर जसा क्रिकेट सामना खेळला जातो, तसाच हा सामना असतो, परंतु त्याचे पिच अठरा फूट असते. सहा जणांचा एक संघ असतो आणि टेनिस बॉलवर सहा षटकांची मॅच होते. पुण्यात ऋषांग, जनक आणि अमन पगारिया या सतरा वर्षांच्या तरुणांनी हे सामने भरवले. कर्वे रस्त्यावरील एका मॉलच्या टेरेसवर हे सामने दोन दिवस खेळवले गेले. त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरासाठी आठ संघ सहभागी झाले होते.

क्रिकेट लीगमध्ये अधिकाधिक संघ सहभागी व्हावेत, म्हणून या तरुणांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. या माध्यमामधून त्यांनी या मान्सून क्रिकलीगचा गाजावाजा केला आणि 16 ते 24 या वयोगटांतील खेळाडू असलेल्या आठ संघांमध्ये त्यांनी सामने खेळविले. क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षकांनाही बोलावण्यात आले. या छोटेखानी सामन्यांचा त्यांनीही आनंद लुटला. 
केवळ क्रिकेट सामन्यावर हे तरुण थांबले नाहीत. त्यांनी विजेते संघही निवडले. अंतिम सामना पुण्यातील 'सुपर सेवन' आणि पिंपरी-चिंचवडमधील 'हिट अँड रन' या संघांमध्ये झाला. यातील 'सुपर सेवन' संघाने विजय मिळवत बारा हजार रुपयांचे पारितोषिकही मिळविले.

"सध्याच्या युगात मुले मोबाइल गेम, इलेक्‍ट्रॉनिक्‍स गॅजेटमध्ये रमलेली असतात. मैदान, खेळ यांच्यापासून ते दूर जात आहेत. अशा मुलांमध्ये पुन्हा मैदानावर येऊ खेळण्याची आस निर्माण व्हावी, असा उद्देश आम्ही ठेवला होता. त्यात क्रिकेटचा विश्‍वकप सुरू आहे. त्याचाही फिव्हर होता. त्यामुळे क्रिकेट सामन्यांमध्ये खूप मजा आली.'' 
- ऋषांग पगारिया
, आयोजक, बॉक्स क्रिकेट लीग 
 


​ ​

संबंधित बातम्या