चीन ओपन बॅडमिंटनमधून श्रीकांतची माघार, सिंधू, साईनावर भारताची मदार

वृत्तसंस्था
Monday, 4 November 2019

-  भारताचा पुरुष एकेरीतील प्रमुख खेळाडू किदांबी श्रीकांत याने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे.

- महिला एकेरीत भारताच्या आशा पुन्हा एकदा साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर अवलंबून असतील. 

- दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. 

फुझोऊ (चीन) - भारताचा पुरुष एकेरीतील प्रमुख खेळाडू किदांबी श्रीकांत याने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचवेळी महिला एकेरीत भारताच्या आशा पुन्हा एकदा साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यावर अवलंबून असतील. 
या स्पर्धेत श्रीकांतची पहिल्याच फेरीत दोन वेळच्या जगज्जेत्या केंटो मोमोटा याच्याशी गाठ पडणार होती. मात्र, त्याने स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. श्रीकांत आता पुढील आठवड्यात हॉंग कॉंग ओपन वर्ल्ड टूर स्पर्धेत सहभागी होईल. त्यामुळे आता एकेरीच्या लढतीत महिला विभागात साईना आणि सिंधू याच भारताच्या तारणहार असतील. दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. 
यंदाच्या मोसमात सलग तीन स्पर्धांत सुरवातीलाच आव्हान संपुष्टात आल्यानंतर सिंधू, साईना यांनी फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठत फॉर्म गवसल्याचे सिद्ध केले होते. मात्र, त्यांची आगेकूच तेथेच थांबली होती. आता चीन ओपन मध्ये या सगळ्याची परतफेड करण्यासाठी या दोघी आतूर असतील. साईनाची सलामी चीनच्या कई यान, तर सिंधूची लढत जर्मनीच्या वोने ली हिच्याशी होणार आहे. दोघींची आगेकूच कायम राहिल्यास उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर कॅरोलिना मरिन, तर साईनासमोर अकाने यामागुची यांचे आव्हान येऊ शकते. 
पुरुष एकेरीत बी. साईप्रणित, समीर वर्मा, पी. कश्‍यप आपली सुरवात अनुक्रमे टॉमी सुगिआंतो, ली चेऊक यीयू आणि सिथ्थीकेम थम्मासिन यांच्याविरुद्ध करतील. एच. एस प्रणॉयसमोर डेन्मार्कच्या रास्मस गेमके याचे आव्हान असेल. 
दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग कोरियाच्या किम गी जुंग-ली यंग डाए यांच्याविरुद्ध आपल्या मोहिमेस सुरवात करतील. मनु अत्री-बी. सुमीत रेड्डी तसेच महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी, मिश्र दुहेरीत सात्विक-अश्‍विनी, प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी या जोड्या खेळणार आहेत. 
 


​ ​

संबंधित बातम्या