चीन ओपन बॅडमिंटन - सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

-जगज्जेतेपदानंतर अपयशाने भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची पाठ चीनमध्येही सोडली नाही

- तैवानच्या यु पो पाई हिने 74 मिनिटांच्या लढतीत सिंधूचा 21-13, 18-21, 21-19 असा पराभव केला.

- मिश्र दुहेरीत मात्र सात्विकसाईराज रंकीरेड्डी-अश्‍विनी पोनप्पा यांनी विजयी सुरवात केली. 

फुझोऊ (चीन) - जगज्जेतेपदानंतर अपयशाने भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची पाठ चीनमध्येही सोडली नाही. सिंधूला मंगळवारी पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र दुहेरीत मात्र सात्विकसाईराज रंकीरेड्डी-अश्‍विनी पोनप्पा यांनी विजयी सुरवात केली. 
जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या सिंधूला या मोसमात चीन, कोरिया आणि डेन्मार्क येथील स्पर्धेत पहिल्याच फेरीत आव्हान गमवावे लागले आहे. यात आता या नव्या पराभवाची भर पडली. तैवानच्या यु पो पाई हिने 74 मिनिटांच्या लढतीत सिंधूचा 21-13, 18-21, 21-19 असा पराभव केला. पाई जागतिक क्रमवारीत 42व्या स्थानावर आहे. 
पुरुष एकेरीत एच. एस प्रणॉय यालाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, दुहेरीत सात्विकसाईराजने चिराग शेट्टी आणि मिश्र दुहेरीत अश्‍विनी पोनप्पाच्या साथीत आपली आगेकूच सुरू केली. मिश्र दुहेरीत सात्विक-अश्‍विनी जोडीने कॅनडाच्या जोशुहा हर्लबुर्ट यू-जोसेफी वू जोडीचा 21-19, 21-19 असा पराभव केला. आता त्यांची गाठ कोरियाच्या पाचव्या मानांकित सेओ सेऊंग जाए-चाए युजुंग यांच्याशी पडणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विकने चिरागच्या साथीत फिलिप आणि रायन चेऊ जोडीचा 21-9, 21-9 असा पराभव केला. 
सिंधूने पहिल्या गेमला 3-0 अशी आश्‍वासक सुरवात केली. पण, त्यानंतर पाईने प्रतिआक्रमण करत 4-4 अशी बरोबरी साधली आणि नंतर 8-4 अशी आघाडी मिळविली. गेमच्या मध्याला तिने 11-5 असे निर्विवाद वर्चस्व राखले. त्यानंतर तिने 20-8 अशी मोठी आघाडी घेतली. तेव्हा सिंधूने पाच गेम पॉइंट वाचवले. पण, ती पाईला आणखी आव्हान देऊ शकली नाही. 
दुसऱ्या गेमला सिंधूचा खेळ बहरला आणि तिने 7-4 अशी आघाडी घेत ती सतत वाढवत नेली. पाईकडून तिला प्रतिकार झाला, मात्र सिंधू दुसरी गेम जिंकण्यात यशस्वी ठरली. तिसऱ्या निर्णायक गेममध्ये पाईने 8-2 आणि 11-3 अशी आघाडी भक्कम केली. गेमच्या मध्यानंतर सिंधूने सलग नऊ गुण घेत आघाडी 12-15 अशी कमी केली. या स्थितीत पुन्हा सलग सहा ुगणांची कमाई करत सिंधूने 18-15 अशी आघाडी मिळविली. पण, याच क्षणी सिंधूची एकाग्रता भंग पावली आणि पाईने सलग चार गुण घेत मिळविलेली आघाडीचे विजयात रुपांतर केले. 
--------- 
अन्य भारतीय निकाल 
पुरुष एकेरी ः रॅस्मस गेमके (डेन्मार्क) वि.वि. एच. एस प्रणॉय 21-17, 21-18 
महिला दुहेरी ः ली वेन मेई-झेंग यू (चीन) वि.वि. अश्‍विनी पोनप्पा-एन सिक्की रेड्डी 21-9, 21-8 


​ ​

संबंधित बातम्या