अमेरिकेचा ख्रिस्तीयन कोलमन वेगवान धावपटू

नरेश शेळके
Sunday, 29 September 2019

- खलिफा स्टेडियमवर जागतिक मैदानी स्पर्धेत शंभर मीटरची शर्यत जिंकून 23 वर्षीय कोलमनने प्रथमच जगातील सर्वांत वेगवान धावपटू हा किताब मिळविला. 

-ने दिलेली वेळ स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णपदक विजेत्याने दिलेली दुसरी वेगवान ठरली.

-पुरुषांच्या लांब उडीत जमैकाच्या तजय गेलने जबरदस्त कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. फिल्ड इव्हेंटमध्ये (उडी किंवा फेकीचे प्रकार) यामुळे जमैकाला प्रथमच सुवर्णपदक जिंकता आले.

-50 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत आशियाने वर्चस्व गाजविले. पुरुषांत जपान, तर महिलांत चीनने सुवर्णपदक जिंकले

दोहा - बोल्टचा सुवर्णकाळ संपल्यानंतर त्याचा शंभर मीटर शर्यतीतील वारसदार कोण, हा प्रश्न आता निकाली निघाला असून अमेरिकेचा ख्रिस्तीयन कोलमन हे त्याचे उत्तर आहे. येथील खलिफा स्टेडियमवर जागतिक मैदानी स्पर्धेत शंभर मीटरची शर्यत जिंकून 23 वर्षीय कोलमनने प्रथमच जगातील सर्वांत वेगवान धावपटू हा किताब मिळविला. 
गतविजेता जस्टीन गॅटलीन आणि माजी विजेता योहान ब्लेक शर्यतीत असले तरी सर्वांच्या नजरा चौथ्या लेनमधून पळणाऱ्या कोलमनवर होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रकुल विजेत्या अकानी सिम्बिनेने पाचव्या लेनमधून वेगवान प्रारंभ केला. मात्र, तीस मीटरनंतर कोलमनने त्याला गाठलेच आणि उर्वरित सत्तर मीटर कोलमनचेच होते. अंतिम रेषेच्या दोन पाऊल आधीच त्याने आपल्या विजयाचा जल्लोष सुरू केला होता. दोन वर्षांपूर्वी लंडनमध्ये गॅटलीन पाठोपाठ रौप्यपदक जिंकून कोलमनने आपण बोल्टचा वारसदार आहोत, हे संकेत दिले होते. हे संकेत आज खरे ठरले. त्याने दिलेली वेळ स्पर्धेच्या इतिहासात सुवर्णपदक विजेत्याने दिलेली दुसरी वेगवान ठरली. यापूर्वी बोल्टने 2009 च्या स्पर्धेत 9.58 सेकंदांचा विश्वविक्रम केला होता, ती वेळ अव्वल स्थानावर आहे. विजयानंतर कोलमन म्हणाला, ""माझ्यात गुणवत्ता आहे, हे मला माहीत आहे आणि येथे ती गुणवत्ता दाखवू शकलो. माझा प्रारंभ नेहमीच चांगला होतो. त्यानंतर मी झोकून देतो आणि येथे सर्व काही जुळून आले.'' 37 वर्षीय गॅटलीनने आपले पाचवे वैयक्तिक आणि तिसरे रौप्यपदक जिंकले. 

सिफानने केले चकीत 
महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत पारंपरिकपणे केनिया, इथिओपियाच्या धावपटूंकडून अपेक्षा केल्या जात होती. मात्र, जन्माने इथिओपियन असलेल्या नेदरलॅंडच्या सिफान हसनने सुवर्णपदक जिंकून सर्वांना चकीत केले. अमेरिकेत मो फराहचे प्रशिक्षक अल्बर्तो सालाझार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या सिफानने डावपेचाप्रमाणे नऊ किलोमीटरपर्यंत मागे राहणे पसंत केले होते. प्रथम चार किलोमीटर तर ती सर्वांत शेवटी होती. 
पुरुषांच्या लांब उडीत जमैकाच्या तजय गेलने जबरदस्त कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. फिल्ड इव्हेंटमध्ये (उडी किंवा फेकीचे प्रकार) यामुळे जमैकाला प्रथमच सुवर्णपदक जिंकता आले. रिओ ऑलिंपिक विजेता जेफ हॅंडरसन रौप्यपदाकाच मानकरी ठरला. स्पर्धेपूर्वी संभाव्य विजेता असलेल्या क्‍युबाच्या जुआन इचेवारियाची ब्रॉंझपदकावर घसरण झाली. 50 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत आशियाने वर्चस्व गाजविले. पुरुषांत जपान, तर महिलांत चीनने सुवर्णपदक जिंकले. 

निकाल ः (पुरुष- मीटर) ः ख्रिस्तीयन कोलमन (अमेरिका- 9.76 सेकंद), जस्टीन गॅटलीन (अमेरिका- 9.89 सेकंद), आंद्रे दी ग्रास (कॅनडा- 9.93 सेकंद), लांब उडी - तजय गेल (जमैका- 8.69 मीटर), जेफ हॅंडरसन (अमेरिका- 8.39 मीटर), जुआन इचेवारिया (क्‍युबा - 8.34 मीटर). 
महिला - दहा हजार मीटर - सिफान हसन (नेदरलॅंड- 30 मिनिटे 17.62 सेकंद), लेतेसेनबेट गिडे (इथिओपिया- 30 मिनिटे 21.23 सेकंद), ऍग्नेस तिरोप (केनिया- 30 मिनिटे 25.20 सेकंद). 

महत्त्वाचे 
- शंभर मीटर शर्यतीत अमेरिकेचे दहावे सुवर्ण 
- 2005 नंतर जमैकाला शंभर मीटरमध्ये पदक नाही 
- 1999 नंतर कॅनडाला प्रथमच पदक 
- पुरुष लांब उडीत जमैकाला प्रथमच सुवर्ण 
- महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत नेदरलॅंडला आणि 95 नंतर युरोपियन देशाला प्रथमच सुवर्ण 

""गेल्यावेळी रौप्यपदक जिंकलो त्या वेळी अनेकांना आश्‍चर्य वाटले होते. या वेळी दावेदार असल्याने प्रचंड दबाव होता. मात्र, सुवर्णपदक जिंकून अपेक्षापूर्ती केली त्याचा आनंद आहे.'' 

- ख्रिस्तीयन कोलमन, सुवर्णपदक विजेता 


​ ​

संबंधित बातम्या