World Cup 2019 : संघ निवडीवर आता प्रशासकीय समितीही विचारणार जाब

वृत्तसंस्था
Friday, 12 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर उपांत्य फेरीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली यांना चुकीच्या संघनिवडीबद्दल सर्वोच्च न्यायलयाने नेमलेलेली प्रशासकीय समिती जाब विचारणार आहे.  

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील यशस्वी कामगिरीनंतर उपांत्य फेरीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली यांना चुकीच्या संघनिवडीबद्दल सर्वोच्च न्यायलयाने नेमलेलेली प्रशासकीय समिती जाब विचारणार आहे.  

प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय, सदस्य डायना एड्लजी आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल रवी थोडगे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेचा मुळ विषय 2020मध्ये होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकासाठी संघ निवड हा असणार आहे. 

''कर्णधार आणि प्रशिक्षक मायदेशी परतले की आम्ही नक्कीच त्यांच्याशी चर्चा करणार आहोत,'' असे राय यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतरही उपांत्य फेरीत 240 धावांच्या आव्हानासमोर भारतीय फलंदाजी न्यूझीलंडच्या स्विंग माऱ्यासमोर ढेपाळली होती. त्यामुळे हा पराभव भारतीयांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मायदेशी परतल्यावर संघ निवड, मधल्या फळीतले अपयश आणि डावपेच आखण्यात आलेले अपयश अशा आणि त्याला जोडून येणाऱ्या असंख्य प्रश्‍नांची सरबत्तीच प्रशिक्षक आणि कर्णधारांवर केली जाणार आहे. 

विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल यांच्याखेरीज एकही फलंदाज आपला स्तर दाखवू शकला नाही. मधल्या फळीत निवड झालेले दोन फलंदाज यांना मूळ संघ निवडताना पहिली पसंती नव्हती. आता संघ हरल्यावर संघ निवडीमधील त्रुटी दिसू लागल्या आहेत.

धोनी तंदुरुस्त असताना देखील एकाच वेळी तीन यष्टिरक्षकांना संघात खेळविण्याचा निर्णय या सगळ्यात कळीचा ठरणार असा अंदाज बांधला जात आहे. स्पर्धेसाठी दिनेश कार्तिकची निवड राखीव यष्टिरक्षक म्हणून करण्यात आली असून, धोनी जखमी झाला तरच तो खेळेल असे निवड समिती अध्यक्ष एम. एस.के. प्रसाद यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरही तीन यष्टिरक्षक कशासाठी खेळविले ? हा आणि असे अनेक प्रश्‍न आता संघ व्यवस्थापनाची वाट बघत आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या