कोपा अमेरिका फुटबॉल : मेस्सी बहरला, तरीही हरला!

वृत्तसंस्था
Wednesday, 3 July 2019

प्रीमियर साखळीत खेळणाऱ्या गॅब्रिएल जेसस आणि रॉबर्टो फिर्मीनो यांच्या गोलमुळे ब्राझीलने 2-0 बाजी मारली. पण, त्यापेक्षाही अर्जेंटिनाचा खराब खेळ ब्राझीलच्या पथ्यावर पडला होता. त्यामुळे मेस्सीचा आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला.

बेलो हॉरिझॉंते : लिओनेल मेस्सीने प्रयत्नांची शर्थ करताना आपला खेळ कमालीचा उंचावला. पण, सहकाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करू शकला नाही. त्यामुळे अर्जेंटिनास कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलविरुद्ध हार पत्करावी लागली. पण, मेस्सीने अर्जेंटिनास विजेतेपद मिळवून देण्यासाठी निवृत्त न होण्याचे ठरविले. 

प्रीमियर साखळीत खेळणाऱ्या गॅब्रिएल जेसस आणि रॉबर्टो फिर्मीनो यांच्या गोलमुळे ब्राझीलने 2-0 बाजी मारली. पण, त्यापेक्षाही अर्जेंटिनाचा खराब खेळ ब्राझीलच्या पथ्यावर पडला होता. त्यामुळे मेस्सीचा आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. 

मेस्सी चार अंतिम सामन्यांत पराजित झाला आहे. त्यातील तीन तर 2014 ते 2016 च्या दरम्यान होते. त्याला आता नवव्या स्पर्धेत पदकाविना परतावे लागत आहे. पण, त्यास तो पूर्ण जबाबदार नव्हता. या स्पर्धेतील यापूर्वीच्या चार सामन्यांत तो निष्प्रभ होता. पण, कडव्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध तो बहरला. त्यामुळे संघाचा खेळ जास्त सरस झाला होता. पण, सहकाऱ्यांची पुरेशी साथ नसल्याने मेस्सी संघाला विजयी करू शकला नाही. 

मेस्सी एफसी आता नक्कीच म्हटले जाईल. त्याने बार्सिलोनास 29 विजेतीपदे मिळवून दिली आहेत, तर अर्जेंटिनासाठी ऑलिंपिक सुवर्णपदकाव्यतिरिक्त काहीही जिंकलेले नाही. मेस्सी मॅराडोनाप्रमाणे संघास प्रेरित करीत नाही, हे टीकाकारांचे मतच खरे ठरले. तीन वर्षांपूर्वी (2016) कोपा अमेरिका स्पर्धेत अंतिम लढत गमाविल्यावर मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा निरोप घेतला होता. पण, तो 2018 च्या विश्‍वकरंडकासाठी परतला. आता त्याने अर्जेंटिनाच्या प्रगतीसाठी खेळत राहण्याचे ठरविले आहे. उपांत्य लढत गमाविल्यावर प्रोत्साहित करणाऱ्या प्रेक्षकांना सलाम करीत त्याने खेळत राहणार असल्याचेच सूचित केले. 

आम्ही हरलो असलो, तरी नक्कीच क्षमता दाखविली आहे. आमच्यावर टीका होण्याऐवजी आम्हाला प्रोत्साहित केले जाईल, अशी अपेक्षा आहे. चाहत्यांनी संघाच्या प्रगतीसाठी साथ द्यायला हवी. माझा संघासोबत चांगला सूर जुळला आहे, मी त्यांच्यासोबतच राहणार आहे, असे मेस्सी म्हणाला. पुढील वर्षी कोपा अमेरिकाचे अर्जेंटिना सहयजमान आहेत, त्यामुळेच मेस्सीने खेळण्याचे ठरविले असावे.


​ ​

संबंधित बातम्या