टोकियो ऑलिंपिकला कोरोनाची लागण?

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

प्रत्येक दिवसागणिक धास्ती वाढवत असलेल्या कोरोनामुळे टोकियो ऑलिंपिकचे संयोजनही संकटात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीतील वरिष्ठ सदस्यांनीच ही टिप्पणी केल्यामुळे स्पर्धेच्या भवितव्याबाबत शंका घेतली जात आहे.

पॅरीस : प्रत्येक दिवसागणिक धास्ती वाढवत असलेल्या कोरोनामुळे टोकियो ऑलिंपिकचे संयोजनही संकटात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीतील वरिष्ठ सदस्यांनीच ही टिप्पणी केल्यामुळे स्पर्धेच्या भवितव्याबाबत शंका घेतली जात आहे.

टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन 24 जुलैस आहे. त्यापूर्वी तीन महिने म्हणजे 24 मेपर्यंत याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो, असे समितीतील वरिष्ठ सदस्य डीक पौंड यांनी सांगितले. पौंड चाळीसहून जास्त वर्ष समितीचे सदस्य आहेत, तसेच ते समितीतील सर्वात बुजूर्गही आहेत. समितीचे अध्यक्ष थॉमस बाश यांच्यापेक्षा ते तेरा वर्षांनी समितीत सीनियर आहेत. ऑलिंपिकबाबतचा अंतिम निर्णय मेच्या अखेरपर्यंत होऊ शकतो, ही टिप्पणी त्यांनी केली. त्यावर स्पर्धा रद्द होऊ शकते, असेच संकेत दिले जात आहेत. त्यावर त्यांनी तुम्ही खूप दूरचे बघता, अशी सारवासारव केली.

ऑलिंपिकसारखी स्पर्धा रद्द करण्याचा किंवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय सोपा नसतो. त्यात सर्वच देश असतात. त्यांनी त्यानुसार आपला स्पर्धा कार्यक्रम तयार केलेला असतो. त्याचबरोबर टीव्ही कंपन्यांनीही काही करार केलेले असतात. केवळ काहीही चर्चा न करता ऑक्‍टोबरमध्ये स्पर्धा होईल असे म्हणता येत नाही. ऑलिंपिक रद्द झाल्यास त्याचा आर्थिक फटका जगभरातील राष्ट्रीय संघटनांनाही बसतो.
- डीक पौंड, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती सदस्य

सध्याच्या परिस्थितीत ऑलिंपिक अन्य देशात घेण्याची शक्‍यता फेटाळली जात आहे. या परिस्थितीत काही महिने किंवा एक वर्ष स्पर्धा लांबणीवर पडू शकते हा पर्याय मानला जात आहे. मात्र हा निर्णय घेण्यासाठी स्पर्धेपूर्वी दोन महिने हा कमी कालावधी असल्याचे संकेत पौंड देतात. ऑलिंपिकपूर्वीच्या दोन महिन्यात खूप काही घडते. सुरक्षा, भोजन, ऑलिंपिक नगरी, हॉटेल, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे स्टुडिओ यांसारख्या अनेक गोष्टी आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाची धास्ती आता चीनपुरतीच मर्यादित नसून त्याचा कोरिया, इराणमधील धोकाही वाढला आहे. सुरुवातीस याची व्याप्ती आशियापुरतीच असेल असे वाटले होते, पण आता इटलीतही याचा धोका वाढला आहे. अर्थात ऑलिंपिक रद्द करणे हा निर्णय सोपा नसेल. युद्ध सोडल्यास स्पर्धा वेळापत्रकानुसार झाली आहे.

 


​ ​

संबंधित बातम्या