2011 चे चॅम्पियन! सध्या कोण कुठे आणि काय करतात? 

टीम सकाळ स्पोर्ट्स
Friday, 2 April 2021

दशकपूर्तीनंतर जाणून घेऊयात टीम इंडियाला दुसऱ्यांदा सोनेरी क्षणाची अनुभूती देणारे चॅम्पियन सध्या काय करताहेत याच्यावर एक नजर....  

भारतीय संघाने 28 वर्षानंतर 2 एप्रिल 2011 मध्ये दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या विजयात प्रत्येक खेळाडूंचे योगदान महत्त्वपूर्ण असेच होते. दशकपूर्तीनंतर जाणून घेऊयात टीम इंडियाला दुसऱ्यांदा सोनेरी क्षणाची अनुभूती देणारे चॅम्पियन सध्या काय करताहेत याच्यावर एक नजर....  

महेंद्रसिंह धोनी : भारतीय संघाला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे मैदान सोडले असले तरी आयपीएलमध्ये तो मैदानात उतरल्याचे दिसणार आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत असून आगामी हंगामासाठी त्याने मुंबईत सरावालाही सुरुवात केली आहे. भारतीय संघाला सर्व आयसीसी ट्रॉफ्या मिळवून देणाऱ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तीन वेळा जेतेपद मिळवले आहे. यंदाच्या हंगामात त्याच्या नेतृत्वाखालील संघ कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.    

विरेंद्र सेहवाग : 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा उप-कर्णधार विरेंद्र सेहवागनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कॉमेंट्री पॅनलसह सोशल मीडियावरील हटके व्हिडिओमुळेही चर्चेत असतो. वर्ल्ड कपमध्ये भारताच्या डावाची सुरुवात करणाऱ्या सेहवागने स्पर्धेत 380 धावा केल्या होत्या. 

सचिन तेंडुलकर : वर्ल्ड कप स्पर्धेत 482 धावा करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलक सामाजिक कार्य तसेच मुंबई इंडियनशी कनेक्टेड आहे. नुकतीच तेंडुलकरने वर्ल्ड कपची पुनरावृत्ती केली होती. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये त्याच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्सने जेतेपद पटकावले होते. रायपूरमधील स्पर्धतून मुंबईला परतल्यानंतर सचिनला कोरोना झाल्याचे समोर आले असून तो मुंबईच्या रुग्णालयात दाखल आहे.  

विराट कोहली : भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी त्या संघाचा सदस्य असलेला विराट कोहली 22 वर्षांचा होता. सध्याच्या घडीला तो भारतीय संघाचे नेतृत्व करत असून त्याच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ 2019 चा वर्ल्ड कप खेळला. विराटही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करतो.  

युवराज सिंह : मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी ठरलेल्या युवीने वर्ल्ड कपमध्ये  362 धावांसह 15 विकेट घेतल्या होत्या. स्पर्धेत त्याने चार वेळा मॅन ऑफ द मॅचचाही पुरस्कार मिळवला. कॅन्सरचा सामना केल्यानंतर युवराज सिंग निवृत्तीनंतर आता कॅन्सरग्रस्तांसाठी एक खास फाउंडेशनसाठी काम करतो.  

सुरेश रैना : 2017 पासून भारतीय संघात जागा मिळवण्यात अपयशी ठरलेल्या सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 मध्ये धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात यंदाच्या आयपीएलची तयारी करत आहे.  

गौतम गंभीर  : भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये 97 धावांची दमदार खेळी करणारा गंभीर आता राजकीय आखाड्यात उतरला आहे. भाजपमध्ये प्रवेश करुन आता तो खासदार म्हणून काम पाहत आहे. 

रविचंद्रन अश्विन : कसोटी क्रिकेटमध्ये जलद 300 विकेट्सचा टप्पा पार करणारा गोलंदाज सध्याही कसोटीचा कायमस्वरुपी आणि भरवशाच्या खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून तो खेळताना पाहायला मिळणार आहे.  

पियूष चावला : 2012 मध्ये पियूष चावला भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानतंर तो आयपीएलमध्ये व्यस्त दिसला. यंदाच्या वर्षी तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. 

हरभजन सिंह : 4 वर्षांपूर्वी भारतीय संघाकडून शेवटचा सामना खेळणारा हरभजन सिंग कॉमेंट्री पॅनलमध्ये दिसतो. आयपीएलमध्येही तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात आहे. 

झहीर खान : 2015 मध्ये झहीर खान यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2012 मध्ये त्याने इंडियाकडून शेवटचा सामना खेळला.  

आशीष नेहरा : 2017 मध्ये आशिष नेहराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2016 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्सच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करणारा नेहरा काँमेट्री पॅनलमध्येही दिसतो. 

यूसुफ पठाण : पठाणने याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो इंडिया लिजेंड्सकडून खेळताना दिसला. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो स्वत:च्या व्यवसायावरही लक्ष देत आहे. सचिन पाठोपाठ त्याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  

मुनाफ पटेल : 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 11 विकेट घेणाऱ्या मुनाफ पटेलची कारकिर्द दुखापतीमुळे फार अल्प राहिली. तो बॉलिंग कोचचे काम करत आहे. 

श्रीसंत : 2013 मध्ये आयपीएल स्पॉटफिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर 7 वर्षानंतर श्रीसंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीनंतर तो  तो पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बाळगून आहे.  

गॅरी कस्र्टन : वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचे तत्कालीन कोच गॅरी कस्र्टन आयपीएल, बीबीएल मध्ये कोचिंक केले आहे. मागील वर्षी पाकिस्तान संघाने त्यांना कोचिंगची ऑफर दिली होती.  

एरिक सिमन्स : दक्षिण आफ्रिका क्रिकेटरने  भारतीय गोलंदाजांना मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पार पाडली होती. आयपीएलसह अन्य क्रिकेट लीगशी ते जोडले गेले आहेत.  

पॅडी अप्टन : मेंटल हेल्थ फिटनेस कोच पॅडी दक्षिण अफ्रिकेच्या संघाशीही जोडले गेले आहेत. त्यांनी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सला कोचिंग दिली.  बिग बॅश लीगमध्येही ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसले. 

नितिन पटेल : फिजियो नितिन पटेल यांनी वर्ल्ड कप 2011 स्पर्धेच्या तीन दिवस अगोदर सूत्रे हाती घेतली होती. ते बराच काळ टीम इंडियासोबत होते.  
रामजी श्रीनिवासन : स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोच श्रीनिवासन अब सध्या स्वत:ची अकादमी चालवतात.  

माइक हॉर्न : मोटिवेशनल कोच माइक देखील वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग होते. 2014 मध्ये ते जर्मन फुटबॉल टीम आणि आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सशी जोडले गेले होते. ते अजूनही आपले काम करत आहेत.  


​ ​

संबंधित बातम्या