AUSvsIND : तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने घेतला मोठा निर्णय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे या सामन्यावर टांगती तलवार निर्माण झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आगामी तिसरा कसोटी सामना सिडनीच्याच मैदानावर खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता या सामन्यासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत घट करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.
क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या
सिडनी क्रिकेट मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्यासाठी दर्शकांच्या उपस्थितीमध्ये कपात करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने याबाबतची माहिती आज जाहीर केली. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, सिडनीतील न्यू साउथ वेल्स भागात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात 25 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
सिडनीत होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कोरोनाची खबरदारी म्हणून पन्नास टक्के दर्शकांना स्टेडियम मध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता यामध्ये आणखी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थिती लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडनीतील उत्तर भागात मोठया प्रमाणावर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. सिडनीत 31 डिसेंबर रोजी कोरोना विषाणूचे दहा संक्रमित रुग्ण आढळले होते. त्यामुळे मागील दोन आठवड्यांमध्ये सिडनीतील कोरोना बाधित प्रकरणांची संख्या 170 वर पोहचली आहे.
Acting on the advice of the NSW Government, we're working together with Venues NSW to ensure the safety of patrons attending the Vodafone Pink Test, with a crowd capacity limited to 25% initially.
Important information for ticket holders and fans: https://t.co/5H1cc1O1HF pic.twitter.com/z0aVy4FqEG
— Cricket Australia (@CricketAus) January 4, 2021
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला डे नाईट सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आता तिसरा सामना नवीन वर्षात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे 15 जानेवारी ते 19 जानेवारीला खेळवण्यात येईल.