तळात भागीदारी झाल्यावर मोठा परिणाम - अजिंक्य रहाणे

सुनंदन लेले
Tuesday, 24 August 2021

जेव्हा आठ फलंदाज बाद झालेले असतात, तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज मनाने पुढील डावात कशी फलंदाजी करायची याचा विचार करू लागतात, पण जेव्हा तळातील फलंदाज भागीदारी करतात तेव्हा त्याचा मोठा मानसिक परिणाम समोरच्या संघातील फलंदाजांवर होतो. मोठे श्रेय आपल्या तळाच्या फलंदाजांना द्यावे लागेल.

लंडन - जेव्हा आठ फलंदाज बाद झालेले असतात, तेव्हा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज मनाने पुढील डावात कशी फलंदाजी करायची याचा विचार करू लागतात, पण जेव्हा तळातील फलंदाज भागीदारी करतात तेव्हा त्याचा मोठा मानसिक परिणाम समोरच्या संघातील फलंदाजांवर होतो. मोठे श्रेय आपल्या तळाच्या फलंदाजांना द्यावे लागेल. या फलंदाजांनी सातत्याने सरावात फलंदाजी करायचा आग्रह धरला. त्यांना संघाकरिता काही तरी अजून करून दाखवायची जिद्द आहे असेच त्या प्रयत्नातून दिसते. दुसऱ्या सामन्यात शमी-बुमरा भागीदारीने इंग्लंड संघावर काय आघात केला हे आपण बघितले आहे, असे अजिंक्य रहाणेने सांगितले.

गेल्या सामन्याबद्दल बोलताना रहाणे म्हणाला, ‘आम्हाला एकाग्रता राखायची आहे. गेल्या सामन्यात जे झाले ते चांगले झाले, पण आता तो इतिहास झालाय. आता लक्ष वर्तमानात काय करायचे याकडे आहे. माझ्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर टीकेने मला प्रेरणा मिळते त्यापेक्षा भारतीय संघाकरता खेळणे हीच सर्वांत मोठी प्रेरणा आहे. खराब काळातही मेहनतीवर विश्वास ठेवून मी आणि चेतेश्वर संघाकरता काय करायचे याचा विचार करतोय.’

सध्याच्या भारतीय संघातील कोणीच हेडिंग्ले मैदानावर कसोटी सामना खेळला नाहीय. त्याविषयी मत मांडताना रहाणे म्हणाला, ‘आम्ही सगळेच येथे पहिला सामना खेळतोय याचे फार मोठे आव्हान वाटत नाही. इंग्लंडमध्ये सामना सुरू झाल्यावर फलंदाजी असो वा गोलंदाजी, चांगला खेळ करून चांगली लय सापडणे मोलाचे ठरते. आमचा तोच प्रयत्न असणार आहे.लॉर्डसवरील सामन्यात दुसऱ्या डावात माझी चेतेश्वरबरोबर भागीदारी झाली आणि संघाला अडचणीतून मार्ग काढता आला. कठीण काळात तग कसा धरता येत येईल याचा आम्ही विचार करत होतो. आमची आघाडी १७०-१८० च्या पुढे गेली की समोरच्या संघाला त्याचा पाठलाग करताना अडचण येईल याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. मग काय घडले सर्वांनी बघितले, पण तरीही मी म्हणेन जे झाले ते झाले. आता येणाऱ्या सामन्यात काय करायचे आहे याकडे लक्ष द्यायला हवे’, जाता जाता रहाणेने प्राधान्य कशाला आहे हे स्पष्ट केले.

शार्दुल तंदुरुस्तीच्या मार्गावर
इंग्लंड संघाला अजून एक धक्का बसला जेव्हा वेगवान गोलंदाज मार्क वुड खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तिसरा कसोटी सामना खेळायला तंदुरुस्त नसल्याचे जाहीर झाले आहे. दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर दुखापतीतून सावरल्याचे रहाणेने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या