मुंबई प्रशिक्षक निवडीचे भिजत घोंगडे
निवड आज निश्चित होणार असल्याची सचिवांची ग्वाही
मुंबई : मुश्ताक अली ट्वेंटी 20 स्पर्धेसाठी मुंबईचा संघ रवाना होण्यास जेमतेम दोन आठवडे उरले आहेत. पण मुंबईचे संघ मार्गदर्शक तसेच निवड समितीची निवड कार्यकारी परिषदेच्या आजच्या बैठकीत झाली नाही. संघटनेचे अध्यक्ष आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे ही निवड उद्या जाहीर करण्यात येईल, असे संघटनेचे सचिव संजय नाईक यांनी सांगितले.
वृद्धिमन साहाऐवजी पंतला संधी द्या - सुनील गावसकर
मुश्ताक अली ट्वेंटी 20 स्पर्धा 10 जानेवारीपासून आहे. या स्पर्धेसाठी संघांना स्पर्धेच्या ठिकाणी 2 जानेवारीस दाखल होण्याची गरज आहे. त्यामुळे आजच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत वरिष्ठ निवड समिती, तसेच वरिष्ठ संघाचे मार्गदर्शक निश्चित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र क्रिकेट सुधार समितीने सुचवलेली नाव निवडीचे निकष पूर्ण करीत नाहीत, असा आक्षेप काही सदस्यांनी घेतला आणि त्यावरून कमालीचे वाद झाले. अखेर हा निर्णय लांबणीवर टाकण्याचे ठरले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
क्रिकेट सुधार समितीने सुचवलेल्या नावास कार्यकारी परिषद आक्षेप घेऊ शकत नाही, असा दावा करण्यात आला. मात्र समितीने सर्व नावे सुचवून पंधरा दिवस झाले आहेत. त्याचबरोबर निवडीचे निकष काय आहेत, याचीही मागणी केली होती. या परिस्थितीत आता आक्षेप कसा घेतला जातो, अशी विचारणा करण्यात आली. त्यावरून कार्यकारिणीत वाद झाल्याचे समजते.
युवीचे षटकार पुन्हा पाहायला मिळणार; T20 तून कॅमबॅक करण्याचे संकेत
मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव नाईक यांनी अध्यक्ष विजय पाटील आजच्या सभेस उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शक तसेच निवड समितीची उद्या (ता. 16) घोषणा करण्यात येईल. याबाबत कोणताही प्रश्न नाही. आम्ही उद्या संध्याकाळी घोषणा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
ऍबी कुरुविलाही स्पर्धेत?
दरम्यान, मुंबई क्रिकेट संघाच्या मार्गदर्शकपदासाठी सुलक्षण कुलकर्णी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण त्याचबरोबर ऍबी कुरुविला, जतिन परांजपे, संजय पाटील हेही या स्पर्धेत आहेत, असेही समजते. दरम्यान, निवड समिती अध्यक्षपदासाठी सलील अंकोला तसेच जतिन परांजपे यांच्यात चर्चा असल्याचेही एका सदस्याने सांगितले. या समितीत झुल्फीकार परकार, रवी ठक्कर, रवी कुलकर्णी, संजय पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वार्षिक सभा 10 जानेवारीस?
मुंबई क्रिकेट संघटनेची वार्षिक सभा नव्या कार्यक्रमानुसार 10 जानेवारीस होण्याची शक्यता आहे. ही सभा या महिन्याअखेरीस होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सर्व नियमांची पूर्तता होण्यासाठी आता दहा जानेवारी ही तारीख ठरवण्यात आली आहे. रविवारी असल्याने ही तारीख निश्चित केली आहे, असेही सांगण्यात आले. या सभेची तारीख दोन ते तीन दिवसात निश्चित होईल, असे नाईक यांनी नमूद केले.
मुंबईतील क्रिकेट काही दिवसात सुरू?
मुंबईतील क्रिकेटच्या सरावास काही दिवसांत सरकारची मंजुरी मिळणार आहे. त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या मंजुरीनंतर काही दिवसांतच खेळाचा सराव तसेच स्पर्धाही सुरू होतील, असे या बैठकीत सांगण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.