फलंदाजांना टार्गेट माहित नव्हतं ही अफवाच; जाणून घ्या गोंधळामागचे नेमकं कारण

टीम सकाळ स्पोर्ट्स
Wednesday, 31 March 2021

मालिकेत 1-0 अशा पिछाडीवर असलेल्या बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना एका अजब-गजब घटनेमुळे चर्चेत आहे. बांगलादेशच्या फलंदाजांना टार्गेटच माहित नव्हते, अशा बातम्या तुम्ही वाचल्या असाल. हे वाचून तुम्हाला आश्चर्यही वाटले असेल. पण ते प्रकरण रंगवण्यात आले तसे नव्हतेच. पावासाच्या बॅटिंगनंतर डकवर्थ लुईस नियमामुळे हा सर्व गोंधळाचा प्रकार घडला होता. मुळात डकवर्थ लुईसचा नियम हा समजण्यापलिकडचा आहे. यापूर्वीही या नियमाचा अनेक संघांना फटका बसला आहे. जाणून घेऊयात या मॅचमध्ये नेमकं झालं तरी काय? 

पाऊस पडला अन् खेळ बिघडला

मालिकेत 1-0 अशा पिछाडीवर असलेल्या बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या संघाने 17.5 षटकात 5 बाद 173 धावा केल्या असताना पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सामना थांबवण्यात आल्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला 13 चेंडूचा खेळ वाया गेला. न्यूझीलंडचा डाव इथेच संपल्यानंतर डकवर्थ लुईसनुसार त्यांना टार्गेट मिळणार हे निश्चित झाले. 

स्कोअर बोर्डवर किती होतं लक्ष्य

नेपियर मॅक्लीन पार्कच्या मैदानातील स्कोअर बोर्डवर सर्वात पहिल्यांदा 16 षटकात 148 धावा असे लक्ष्य दिसले होते. त्यानंतर स्कोअर बोर्डमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे सांगत दोन्ही फलंदाजांना 16 षटकात 170 धावा करायच्या आहेत असे सांगण्यात आले. 13 व्या षटकात बांगलादेशला पुन्हा नवे टार्गेट देण्यात आले. टार्गेट अवघ्या एका धावेनं वाढवण्यात आले असले तरी यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. डकवर्थ लुईस नियमातील धोका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. 

कॅप्टन्सीची नो वॅकन्सी; स्मिथच्या 'बोलंदाजी'नंतर कोचची फटकेबाजी​

आयसीसी प्रवक्त्याचे स्पष्टीकरण 

सामन्याच्या टार्गेटवरुन मॅच रेफ्री क्रो आणि बांगलादेशचे कोच रसेल डोमिंगो यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यासर्व प्रकरणावर आयसीसी प्रवक्त्यानेही स्पष्टीकरण दिले आहे. स्कोअर बोर्डमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे संभाव्य लक्ष्य फलंदाजांना तोंडी सांगण्यात आले होते. त्यानंतर बदललेल्या लक्षासंदर्भात जेव्हा खेळाडूंनी विचारणा केली त्यावेळी सामना काही क्षणासाठी रोखावा लागला होता.  

न्यूझीलंडचा गोलंदाज हॅमिश बॅनेटच्या डावातील दुसऱ्या षटकातील तीन चेंडू फेकल्यानंतर मॅच रेफ्रीने नव्या टार्गेटवरील शीटवर सही केली. 170 मध्ये एक धाव जोडून 16 षटकात 171 धावांचे लक्ष्य देण्यात आले. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 7 बाद 142 पर्यंतच मजल मारु शकला.  


​ ​

संबंधित बातम्या