भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; रिषभ पंत, सपोर्ट स्टाफ सदस्य बाधित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 July 2021

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, तसेच सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली / लंडन - इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत, तसेच सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या तिघा सहायक मार्गदर्शकांनाही पंत तसेच बाधित सपोर्ट स्टाफ सदस्यांसह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापैकी कोणीही भारतीय संघासोबत डरहॅमला जाणार नाही. 

पंत इंग्लंडमधील त्याच्या नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात आहे. त्याचा घसा खवखवत होता, त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तो बाधित आढळला. पंतचे सहकारी तसेच त्याच्या संपर्कातील सपोर्ट स्टाफही विलगीकरणात होता. त्यांचे तीन दिवसांचे विलगीकरण पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंत हा डेल्टाबाधित आहे. ब्रिटनमध्ये या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत, याकडे भारतीय मंडळाचे सचिव जय शहा यांनी संघव्यवस्थापनाचे लक्ष वेधले होते. 

राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बुधवारी भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची भेट घेतली. मात्र दोघांनीही याबाबत मौन बाळगले आहे. 

गर्दीच्या युरो सामन्यांस पंतची उपस्थित
युरो स्पर्धेतील अंतिम टप्प्याच्या लढती लंडन येथील वेम्बले स्टेडियमवर झाल्या. या सामन्यांच्यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यात रिषभ पंतही होता. त्याला आता कोरोनाची बाधा झाली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या सूत्रांनी यास दुजोरा दिला आहे.

अन्य दोन खेळाडूही बाधित?
पंत व्यतिरिक्त अन्य दोन खेळाडूंनाही कोरोनाची बाधा झाली आहे. तो खेळाडू सुरुवातीच्या चाचणीत पॉझिटिव्ह ठरला, पण काही तासातील चाचणीत निगेटिव्ह ठरला, तर अन्य एका खेळाडूचे विलगीकरण रविवारी संपले असल्याचे वृत्त आहे, पण त्यास दुजोरा मिळालेला नाही. 

२० जुलैपासून सराव सामना
भारतीय क्रिकेट संघ २० जुलैपासून सिलेक्ट कौंटी संघासह तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. त्यासाठी खेळाडूंना गुरुवार दुपारपर्यंत जैवसुरक्षित वातावरणात दाखल होण्यास सांगितले आहे. सध्या तरी पंत वगळता संघातील अन्य कोणताही खेळाडू बाधित नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.


​ ​

संबंधित बातम्या