भारतातील टी-२० वर्ल्डकप होणार अमिरातीत?

पीटीआय
Saturday, 1 May 2021

भारतात दररोज तीन लाखांहून अधिक जण कोरोनाबाधित होत आहेत आणि या परिस्थितीत काही महिन्यात सुधारणा झाली नाही, तर बीसीसीआयला देशात होणाऱ्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर पाणी सोडावे लागेल.

नवी दिल्ली - भारतात दररोज तीन लाखांहून अधिक जण कोरोनाबाधित होत आहेत आणि या परिस्थितीत काही महिन्यात सुधारणा झाली नाही, तर बीसीसीआयला देशात होणाऱ्या विश्वकरंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर पाणी सोडावे लागेल. आयोजनाचे हक्क मात्र कायम राहातील; मात्र स्पर्धा अमिरातीत होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित आहे.

बीसीसीआय मात्र ही स्पर्धा देशातच घेण्याबाबत आशावादी आहे. अमिराती हा पर्याय आमच्यासाठी खुला आहे; मात्र ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये होणाऱ्या स्पर्धेशी आम्ही अदलाबदल करणार नसल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे. भारतासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या स्पर्धेचे आयोजन देशातच करण्यासाठी आम्ही अखेरपर्यंत प्रयत्न करू, असे बीसीसीआयच्या स्पर्धा संयोजन समितीचे संचालक धीरज मल्होत्रा यांनी सांगितले. जर आपल्या देशात ही स्पर्धा होऊ शकली नाही, तर अमिराती हा पर्याय असेल, असेही ते म्हणाले.

भारतात अपेक्षित असलेल्या या स्पर्धेच्या नियोजनाची प्राथमिक तयारी बीसीसीआयने सुरूही केली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत स्पर्धेची नऊ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यात मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूर, हैदराबाद, धरमशाला, अहमदाबाद आणि लखनौ या शहरांचा समावेश आहे; परंतु यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाची सध्याची स्थिती बिकट झालेली आहे.

सध्या तरी इतर बहुतेक देशांनी भारतात विमानप्रवास करण्यास बंदी केली आहे. ती किती काळ कायम राहील, याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. या स्पर्धेला सहा महिने असले, तरी त्याची तयारी काही महिने अगोदरपासून सुरू करावी लागेल. त्यामुळे बीसीसाआयला लवकरच निर्णय घ्यावा लागेल. आयसीसीनेही परिस्थितीचा अंदाज घेत बीसीसीआयला प्लॅन बी तयार ठेवायला सांगितले आहे.

गतवर्षी कोरोना भारतात आल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन होता. त्या वेळी त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन अमिरातीत केले होते. कोणत्याही अडचणीशिवाय ती आयपीएल पार पडली होती; परंतु आयोजनासाठी बीसीसीआयला ९५ कोटी खर्च करावा लागला होता.


​ ​

संबंधित बातम्या