रमेश पोवारांच्या नियुक्तीने बीसीसीआयमध्ये नाराजी?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 May 2021

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मार्गदर्शक पदावरून वुर्केरी रामन यांना हटविल्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळातील वरिष्ठ पदाधिकारी मदनलाल प्रमुख असलेल्या क्रिकेट सल्लागार समिती तसेच महिला राष्ट्रीय निवड समितीवर नाराज आहेत.

नवी दिल्ली - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मार्गदर्शक पदावरून वुर्केरी रामन यांना हटविल्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळातील वरिष्ठ पदाधिकारी मदनलाल प्रमुख असलेल्या क्रिकेट सल्लागार समिती तसेच महिला राष्ट्रीय निवड समितीवर नाराज आहेत. एवढेच नव्हे, तर क्रिकेट सल्लागार समितीच्या वैधतेबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत.

रामन मार्गदर्शक असताना भारतीय महिला संघाने विश्वकरंडक ट्वेंटी २० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यांना दूर करून पुन्हा रमेश पोवार यांची नियुक्ती कशी होते, अशी विचारणा होत आहे. मदनलाल २० मार्चला ७० वर्षांचे झाले. भारतीय मंडळाने लोढा समितीच्या काही शिफारशीत बदल करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयास करताना ७० वर्षांच्या नियमाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. या परिस्थितीत मदनलाल हे समितीच्या अध्यक्षपदी कसे राहू शकतात, अशी विचारणा सुरू झाली आहे. 

मदनलाल आणि सुलक्षणा नाईक यांनी घेतलेला पोवार यांच्या नियुक्तीचा निर्णय व्हेटो वापरून फिरवण्यास सध्या तरी भारतीय मंडळाचे पदाधिकारी तयार नाहीत; पण रामन यांना का हटविले, असा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे. केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्यामुळे रामन कसे दूर होतात, असेही विचारले जात आहे.पोवार यांची फेरनियुक्ती करून त्यांच्यावरील काही वर्षांमपूर्वी झालेला अन्याय दूर करण्यात आला; पण हे करताना रामन यांच्यावर अन्याय का, असा प्रतिप्रश्न विचारला जात आहे.

रामन-डेव्हिड वादंगाचा परिणाम
रामन आणि महिला निवड समितीचे प्रमुख नीतू डेव्हिड यांच्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडण्यावरून वाद झाला होता. एकदिवसीय मालिकेसाठी शेफाली वर्मास दिलेला डच्चू तसेच शिखा पांडेची अंतिम संघात न झालेली निवड, यावरूनही नाराजी व्यक्त झाली होती. हे रामन आणि डेव्हिड यांच्यातील वादामुळे घडल्याचे सांगितले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या