कडक उन्हाळ्यामुळे खेळपट्टीवर परिणाम - गावसकर

पीटीआय
Thursday, 17 June 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात जडेजा आणि अश्विन हे दोन्ही फिरकी गोलंदाज खेळण्याचा अंदाज विक्रमवीर माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात जडेजा आणि अश्विन हे दोन्ही फिरकी गोलंदाज खेळण्याचा अंदाज विक्रमवीर माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केला. साऊदम्टनमध्ये सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे, त्याचा परिणाम खेळपट्टीवर नक्कीच होईल, असे गावसकर यांनी सांगितले. 

या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी असलेल्या समालोचक पॅनेलमध्ये गावसकर यांचा समावेश आहे आणि त्यासाठी ते साऊदम्टनमध्ये आहेत. त्यांनी पीटीआयशी बोलताना तेथील वातावरणावर भाष्य केले. साऊदम्टनमध्ये गेल्या काही दिवसांपासून फार उकाडा होत आहे. त्याचा परिणाम खेळपट्टीवर होऊन ती कोरडी होत जाईल. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना प्रभाव टाकण्याची संधी मिळेल. परिणामी भारतीय संघातून अश्विन आणि जडेजा हे दोन्ही फिरकी गोलंदाज खेळताना दिसू शकतील, असे गावसकर यांनी म्हटले आहे.

साऊदम्टनमधील गेल्या काही दिवसांपासून जास्तीत जास्त तापमान २५ अंश सेल्सिअस असे आहे; परंतु उद्या गुरुवारी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि सामन्यास शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.

जडेजा आणि अश्विन हे दोन्ही फिरकी गोलंदाज खेळले, तर गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही भारताची धार वाढेल, समतोलपणा येईल, असे गावसकर यांचे म्हणणे आहे. भारतीय संघातील खेळाडू अनेकदा इंग्लंड दौऱ्यावर गेलेले आहेत. त्यामुळे येथील हवामानाचा त्यांना चांगला अंदाज आहे, असे गावसकर म्हणतात.


​ ​

संबंधित बातम्या