माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 July 2021

कपिलदेव यांच्या १९८३ विश्वकरंडक क्रिकेट विजेत्या संघातील एक मोहरा आज अंतर्धान पावला. कठीण प्रसंगी भारतीय संघाला वारंवार सावरणारे मधल्या फळीचे फलंदाज यशपाल शर्म (वय ६६) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले.

नवी दिल्ली - कपिलदेव यांच्या १९८३ विश्वकरंडक क्रिकेट विजेत्या संघातील एक मोहरा आज अंतर्धान पावला. कठीण प्रसंगी भारतीय संघाला वारंवार सावरणारे मधल्या फळीचे फलंदाज यशपाल शर्म (वय ६६) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार आहे.

यशपाल शर्मा १९७८ ते १९८५ या काळात भारताकडून ३७ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील त्यांचे योगदान अमूल्य राहिले आहे. दोन अर्धशतके करणारे यशपाल स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम फलंदाज ठरले होते.

विश्वकरंडक स्पर्धेत विंडीजविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात यशपाल यांनी १२० चेंडूत ८९ धावांची खेळी केली होती, त्यामुळे २६२ धावा करणाऱ्या भारताने ३४ धावांनी पराभव केला होता. उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्यांनी केलेली ६१ धावांची खेळी भारताला अंतिम सामन्यात स्थान मिळवून देण्यास निर्णायक ठरली होती.

अशी झाली होती सुरुवात
यशपाल यांचा जन्म लुधियानात झाला होता. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत ते पंजाब, हरियाना आणि रेल्वेकडून खेळले आहेत. १९७७ मध्ये दुलीप करंडक स्पर्धेत दक्षिण विभागाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पूर्व विभागाकडून खेळताना यशपाल यांनी १७३ धावांची निर्णायक खेळी केली होती. दक्षिण विभागाच्या भगवत चंद्रशेखर, अबिद अली आणि इरापल्ली प्रसन्ना या निष्णांत गोलंदाजांविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे यशपाल यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले होते. पाकिस्तान दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली खरी, परंतु कसोटी पदार्पणासाठी त्यांना पुढील दोन वर्षे वाट पाहावी लागली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही ते क्रिकेटशी संबंधित होते. २००४ ते २००५ आणि २००८ ते २०११ या काळात ते राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य होते. २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीचा विश्वविजेत्या संघाची निवड त्यांच्याच निवड समितीने केली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक सामन्यांत पंच आणि सामनाधिकारी अशी जबाबादारी पार पाडली होती.

कपिलदेव निःशब्द
यशपाल शर्मा यांच्या निधनाच्या वृत्ताचा माजी कर्णधार कपिलदेव यांना धक्का बसला. मी निःशब्द आहे, काहीच बोलू शकत नाही, असे ते म्हणाले.

चपळ क्षेत्ररक्षक
यशपाल शर्मा केवळ निर्भिड फलंदाजच नव्हते, तर ते चपळ क्षेत्ररक्षकही होते. सध्याच्या क्रिकेटमध्ये तुम्ही अचुक यष्टींचा वेध घेणारा क्षेत्ररक्षक म्हणून रवींद्र जडेजाचा उल्लेख करता, पण यशपाल शर्माही तसेच यष्टींचा वेध घ्यायचे, अशा शब्दांत कपिलदेव यांच्या विश्वविजेत्या संघातील यशपाल यांचे सहकारी असलेले कीर्ती आझाद यांनी सांगितले.

विश्वकरंडक स्पर्धेत यशपाल माझे रूम पार्टनर होते. यापुढे ८३ च्या विश्वकरंडकाचे यश जेव्हा जेव्हा साजरे केले जाईल तेव्हा यशपाल आमच्यासोबत नसतील, पण त्यांचा आत्मा आमच्यासोबत असेल.
- बलविंदर सिंग संधू

१९८३ च्या आमच्या संघातील सर्वांत फिट असलेला खेळाडू म्हणजे यशपाल होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्काच बसला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची भेट झाली होती. यशपाल पूर्ण शाकाहारी होता व्यायामाबाबत तो काटेकोर होता.
- दिलीप वेंगसरकर

यशपाल यांचे भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान नेहमीच लक्षात राहील. १९८३ च्या त्या संघाकडे पाहूनच मला क्रिकेट खेळण्याची स्फूर्ती मिळाली होती. यशपाल यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे.
- सचिन तेंडुलकर


​ ​

संबंधित बातम्या