विश्‍वकरंडकाचे भवितव्य ठरणार २९ मे रोजी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

आयपीएल स्थगित केली आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे काय? या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने २९ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे.

नवी दिल्ली - आयपीएल स्थगित केली आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे काय? या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयने २९ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. या बैठकीत देशांतर्गत स्पर्धांबाबतही निर्णय अपेक्षित आहे. 

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्व संलग्न संघटनांना सभेची पूर्वसूचना देणारी नोटीस पाठवली आहे. यात त्यांनी देशांतर्गत स्पर्धांचा मुद्दा अधोरेखित केला आहे, परंतु या चर्चेबरोबर देशात नियोजित असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेबाबत आढावा घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले आहे. दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत, तर मृत्यूंचेही प्रमाण चिंता करणारे आहे, या पार्श्वभूमीवर आयसीसीने बीसीसीआयला फेरविचार करायला लावणार हे उघड आहे. आयसीसीची १ जून रोजी बैठक होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने आपल्या बैठकीसाठी २९ मेचा मुहूर्त तयार केला आहे.

भारतात ही प्रतिष्ठेची स्पर्धा होऊ शकली नाही तर अमिराती हा पर्याय असेल. गतवर्षी पूर्ण आयपीएल अमिरातीत झाली होती. यंदाही स्थगित झालेली आयपीएल अमिरातीत पूर्ण करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक भारतात होऊ शकला नाही तर अमिरातीला प्राधान्य दिले जाईल आणि त्याला लागूनच उर्वरित आयपीएलही पूर्ण करण्याचा पर्याय बीसीसीआयकडून तपासला जाईल. 

गेल्या महिन्यात झालेल्या बीसीसीआयच्या कार्यकारी सदस्यांच्या बैठकीत विश्वकरंडक स्पर्धेच्या नियोजनाची प्राथमिक चर्चा झाली होती. आणि त्यात स्पर्धेसाठी अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, दिल्ली धरमशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि मुंबई ही ठिकाणे निश्चित करण्यात आली होती, मुंबईतील कोरोनाची स्थिती आता चांगलीच नियंत्रणात आलेली आहे, परंतु अहमदाबाद, लखनौ, बंगळूर येथील स्थिती चिंता करणारी आहे. त्यामुळे भारतातच ही स्पर्धा खेळण्यावर विचार झाला तर ठिकाणांमध्ये निश्चितच कपात केली जाईल.


​ ​

संबंधित बातम्या